लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवास जसजसा सर्वसामान्यांकरिता खुला होऊ लागला तसतसे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढू लागली आहे. जून २०२० ते आतापर्यंत उपनगरीय मार्गावर आणि मेल-एक्स्प्रेस टर्मिनसवर ४३ हजार ५२६ विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले. यामध्ये उपनगरीय मार्गावरच ३९ हजार ५१६ विनातिकीट प्रवाशांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत असल्याचे बनावट ओळखपत्र बाळगून लोकल प्रवासाची मुभा मिळवणाऱ्यांची संख्याही त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या आकडेवारीवरून वाढल्याचे दिसून येते.

लोकलमधून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वच महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि क्यूआर कोड ई पास बाळगणाऱ्यांना त्यावरच तिकीट उपलब्ध होते, तर अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचारी वगळता अन्य महिलांना प्रवासासाठी ठरावीक वेळा दिल्या असून त्यांना सहज तिकीट उपलब्ध केले जात आहे. तरीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असो वा महिला प्रवासी, काही प्रवाशांकडून बिनदिक्कतपणे विनातिकीट प्रवास केला जात आहे. अशा प्रवाशांवर तिकीट तपासनीसांकडून कारवाई केली जात असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

२०० बनावट ओळखपत्रे जप्त

सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने अनेक जण अत्यावश्यक सेवेचे बनावट ओळखपत्र तयार करून घेतात व लोकल प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत २०० बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात ओळखपत्र बनवून देणाऱ्यांवर कारवाई केली आहे. सात जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बनावट तिकीट तपासनीसालाही पकडल्याचे सांगण्यात आले.

बनावट तिकिटे विकणाऱ्या टोळीला अटक

मुंबई : बनावट तिकीट विकणाऱ्या एका टोळीला ठाणे आरपीएफने पकडले आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या मदतीने तिकिटे विकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्यासह एकूण तीन जणांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून यामध्ये एक हजार प्रवाशांची फसवणूकही झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. यात १ लाख ९० हजार रुपये किमतीची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

संदीप गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने ठाणे आरपीएफकडे एका दलालाद्वारे बनावट तिकिटे देण्यात येत असल्याची तक्रार केली होती. ‘जस्ट डायल’च्या आधारे गुप्ताने एका दलालाकडून ई-तिकीट खरेदी केले होते, जे बनावट निघाले. हे प्रकरण ठाणे रेल्वे सुरक्षा दलाकडे आल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता एक व्यक्ती जस्ट डायलवर रेल्वे तिकिटांचा दलाल असल्याचे सांगून  बनावट तिकिटे विकत असल्याचे निदर्शनास आले. पश्चिम रेल्वेच्या दादर येथील पीआरएसमध्ये कार्यरत असलेल्या नीरज तिवारी यांच्याकडून आरक्षित तिकिटांचा पीएनआर क्रमांक घेऊन प्रवाशांना एचओ कोटामधूून तिकीट आरक्षित असल्याचे सांगत तिकिटांची विक्री करे. याप्रकरणी लातूूर येथून शशी भीमराव सलोने आणि कृष्णा या रेल्वे कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.