शैलजा तिवले

२२ लाख रुपयांचे फर्निचर तीन वर्षांपासून पडून; कॅगच्या अहवालात ‘भगवती’च्या दुर्दशेचा पंचनामा

एकीकडे पालिका रुग्णालयामध्ये अद्ययावत यंत्रे, साधनसामुग्री यांची कमतरता भासत असताना बोरिवली येथील हरिलाल भगवती रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी म्हणून खरेदी केलेली सुमारे ४२ लाखांची यंत्रसामुग्री आणि २२ लाखांचे फर्निचर गेले तीन वर्षे धूळ खात पडल्याचे कॅगच्या अहवालातून उघडकीस आले आहे.

जुने ३७३ खाटांचे रुग्णालय पूर्णपणे पाडून त्या जागी १ हजार खाटांचे अत्याधुनिक मुख्य रुग्णालय सुरू करण्याचा घाट पालिकेने घातला. परंतु पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मंजुरी प्राप्त झाल्यानंतर जवळपास सहा वर्षांनी म्हणजे २०१५ मध्ये पहिल्या टप्प्यातील नर्सिग प्रशिक्षण इमारतीचे काम पूर्ण झाले. यात १० खाटांच्या अतिदक्षता विभागासह ११० खाटांचे रुग्णालय सुरू होणे अपेक्षित होते. परंतु यातील केवळ ४४ खाटा कार्यरत असून अतिदक्षता विभाग कार्यरत झालेलाच नसल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे.

११० खाटांच्या आवश्यकतेनुसार पालिकेने डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६ या काळात खाटा, कपाटे,स्ट्रेचर ट्रॉली तपासणी खाटा , रुग्णांसाठी खाटेलगतची कपाटे इत्यादी सुमारे २२ लाख ८३ हजार रुपयांचे फर्निचर खरेदी केले होते. यातील ५० टक्के फर्निचर आवश्यकता गेल्या तीन वर्षांपासून विनावापर पडून आहे. अतिदक्षता विभागासाठी कृत्रिम श्वसनयंत्रणा, स्वयंचलित र्निजतुकीकरण यंत्रणा, केंद्रीय देखरेख यंत्रणा यासारखी सुमारे ४२ लाख रुपयांची यंत्रसामुग्री फेब्रुवारी २०१६ ते नोव्हेंबर २०१८ या काळात पालिकेने खरेदी केलेली आहेत.  परंतु अद्याप अतिदक्षता विभाग सुरूच झालेला नसल्याने ही सर्व यंत्रे कार्यरत नाहीत. ही यंत्रे त्या त्या ठिकाणी बसविण्यात आली असल्याने यांची मुदत संपत चालली आहे. रुग्णालयासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या रकमेतून ही सर्व खरेदी केली असूनही प्रत्यक्ष रुग्णांना मात्र त्याचा फायदा मिळालेला नसल्याचा आक्षेप कॅगने घेतला आहे.

 ‘रुग्णालयात अपुरे कर्मचारी’

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीतून अतिदक्षता विभागासह ११० खाटांचे रुग्णालय सुरू केले आहे. अतिदक्षता विभागासाठी आवश्यक डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने हा विभाग सुरू झालेला नाही. तर वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात रुजू न झाल्याने संपूर्ण रुग्णालय सुरू केलेले नाही. आवश्यकतेनुसार सर्व जागा उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालय पूर्णपणे सुरू केले जाईल, असे उत्तर प्रशासनाने दिल्याचे कॅगच्या अहवालात नमूद केले आहे.