धुळवडीला पाणी उधळण्यासाठी पूर्व आणि पश्चिम उपनगरातून टँकरला मागणी शून्य
दरवर्षी मुंबईत विविध ठिकाणी पाण्याचे टँकर मागवून धुळवड साजरी केली जायची, पण यंदा धुळवडीच्या उत्सवावर महानगरपालिकेचे नियंत्रण राहिल्याने तसेच राज्यभरातील पाणीटंचाईच्या भीषण दाहकतेमुळे यंदा मुंबईकरांनी पाण्याचा एकही टँकर धुळवड खेळण्यासाठी मागविला नसल्याचे समोर आले आहे. मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर तर केलाच, पण टँकरमालक व पुरवठादार यांनीही धुळवड खेळण्यासाठी पाणी पुरविण्यास नकार देऊन सामाजिक भान जपले. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत गुरुवारी धुळवड खेळण्यासाठी पाण्याचा टँकर मागविला गेला नाही, असे काही टँकरमालक व पुरवठादारांकडून सांगण्यात आले.
दरवर्षी धूलिवंदनाला पाण्याच्या टँकरची मागणी मोठय़ा प्रमाणात असते. मोठी गृहसंकुले, क्लब, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये ‘रेन डान्स’साठी पाण्याचे टँकर मागविले जातात. यात पाण्याचा अपव्ययही अधिक होत असतो. या वर्षी महापालिका तसेच मुंबई पोलिसांनी पाण्याचा टँकर पाठविण्यावर व पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले होते. त्यामुळे तर काहींनी सामाजिक भान जपण्यासाठी टँकरच्या पाण्याचा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला.
गोवंडी, चेंबूर, मानखुर्द या भागांमध्ये पाण्याच्या टँकरचा पुरवठा करणाऱ्या गुरमित सिंग भट्टी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, गेल्या वर्षी सुमारे ८ ते १० पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली होती. मात्र यंदा एकही टँकर मागविण्यात आला नाही. त्यामुळे दिवसभर रिकामे टँकर दुकानासमोरच उभे करून ठेवण्यात आले. याबरोबरच माहिम, वांद्रे, दादर या भागांमधील पाण्याच्या टँकरचे पुरवठादार विकी भट्टी तसेच जेट्टी यांनीही धुळवडीला पाण्याचा टँकर दिला नसल्याची माहिती दिली.
साधारणपणे जुलै महिन्यापर्यंतच पुरेल इतका पाणीसाठा महापालिकेकडे असला तरी राज्यभरातील पाणीटंचाई पाहता धुळवडीच्या उत्साहाबरोबरच पाणी वाचविण्यासाठीही मुंबईकर दक्ष असल्याचे दिसून आले.