26 March 2019

News Flash

बाइकच्या हॅण्डलमध्ये बॅग अडकल्याने चिमुरडीसोबत फरफटत गेली महिला

आशा यांनी डोळ्यांसमोर आपल्या 10 महिन्याच्या मुलीला रिक्षाने चिरडताना पाहिलं

प्रतिकात्मक

बाइकच्या हॅण्डलमध्ये बॅग अडकल्याने आपल्या 10 महिन्याच्या चिमुरडीसोबत महिला फरफटत गेल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डोंबिवलीत ही घटना घडली आहे. सकाळी घराबाहेर पडलेल्या आशा मॅथ्यू यांना आपला आजचा दिवस इतका वाईट असेल याची साधी कल्पनाही नव्हती. आशा यांनी डोळ्यांसमोर आपल्या 10 महिन्याच्या मुलीला रिक्षाने चिरडताना पाहिलं. मुलगी सध्या गंभीर जखमी असून तिला आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. फरफटत गेल्यामुळे त्यादेखील जखमी झाल्या आहेत.

नेमकं झालं असं की, सकाळी असंच चक्कर मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आशा यांची हॅण्डबॅग एका बाइकच्या हॅण्डलमध्ये अडकली आणि ही दुर्घटना झाली. जेव्हा दुर्घटना झाली तेव्हा 35 वर्षीय आशा मॅथ्यू यांनी आपली मुलगी एस्थरला उचलून घेतलं होतं. आशा आपल्या मुलीला घेऊन आईच्या घरी जात असताना त्यांचा तोल गेला आणि शेजारुन जाणा-या बाईकच्या हॅण्डलमध्ये बॅग अडकली आणि त्या फरफटत गेल्या. यावेळी एस्थर त्यांच्या हातातून खाली पडली आणि एक रिक्षा तिच्या अंगावरुन निघून गेली. दुर्घटनेनंतर स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. स्थानिकांना आशा आणि एस्थरला रुग्णालयात दाखल केलं, जिथं त्यांचं सीटी स्कॅन करण्यात आलं.

डॉक्टरांनी तपासणी केली असता, मुलीच्या छातीवर गंभीर जखमा झाल्याचं स्पष्ट झालं. तिला काही हेअरलाइन फ्रॅक्चरही आहेत. तिला सध्या आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीला प्रचंड वेदना होत होत्या. तिला सामान्य स्थितीत आणण्यासाठी पेनकिलर द्यावा लागला. पुढील काहि दिवसांसाठी तिला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे’.

First Published on March 14, 2018 2:10 pm

Web Title: woaman with girl dragged as bag caught in bike