News Flash

गॅलऱ्यांचा फेरा : दालनांचे कोमेजणे, उमलणे..

कलाप्रेमी गॅलरीचालक, हा अभयचा लौकिक यापुढेही अनेकांच्या लक्षात राहील.

खासगी मालकीच्या आर्ट गॅलऱ्यांना अनेकदा आर्थिक कारणांसाठी स्थलांतर करावं लागतं, काही गॅलऱ्या तात्पुरत्या बंदच राहतात.. काही गॅलऱ्यांमध्ये नवी चित्रप्रदर्शनं लागण्याचं प्रमाण अगदी कमी-कमी होत जातं असे अनेक अनुभव मुंबईनं घेतले आहेत. ओढगस्त असली, तरी गॅलरी एकदा काढणारी माणसं सहसा पूर्णपणे बाहेर जात नाहीत, काही ना काही करत राहतात हे विशेष. उदाहरणार्थ, कुलाब्यात २००९ साली सुरू झालेली ‘व्होल्ट’ गॅलरी प्रामुख्यानं आर्थिक कारणांमुळे त्या जागेवरून नाहीशी होऊन मग ‘व्होल्ट आर्ट प्रोजेक्ट्स’ म्हणून अन्य कुठे कुठे प्रकटत राहिली आहे. पण आज हे लिहिण्याचं कारण निराळं आहे..

गुरुवार, दिनांक १४ जुलै रोजी, मुंबईतल्या एका मोठ्ठय़ा जागेतल्या खासगी गॅलरीत ‘अखेरचं प्रदर्शन’ भरतं आहे!

या गॅलरीचं नाव आणि मालकाचं नाव एकच : ‘गॅलरी अभय मस्करा’. कुलाब्याला तिसऱ्या पास्ता लेनमध्ये (कैलाश पर्बतच्या पुढे दोन गल्ल्या) एका मोठय़ा गोदामवजा उंच छताच्या जागेत ही गॅलरी होती.. म्हणजे सध्या तरी आहे; पण यापुढे नसेल. ‘करीन ते चांगलं करीन’ हा बाणा जपणाऱ्या अभयनं अगदी तरुण दृश्यकलावंतांना निवडून, त्यांच्याचसोबत काम केलं- त्यांची प्रदर्शनं लावली आणि यापैकी किमान पाच तरुणांना सर्वार्थानं आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून दिलं! त्यानंच मुंबईच्या आणि देशी-विदेशी कलाक्षेत्राचा अभ्यास करून एक पुस्तकही लिहिलं आहे. अन्य गॅलऱ्यांनी मुद्दाम रियाज कोमू, अनंत जोशी, जितीश कलाट अशा बिनीच्या तरुण चित्रकारांची प्रदर्शनं अभय मस्करा गॅलरीत भरवली होती.. का? कारण रियाज, जितीश किंवा जोशी यांची कामं मुंबईतल्या केवळ याच गॅलरीत मावतील, इतकी अवाढव्य होती!

कलाप्रेमी गॅलरीचालक, हा अभयचा लौकिक यापुढेही अनेकांच्या लक्षात राहील. त्याच्या वडिलांची ही जागा. ती आता, वडिलांच्या मृत्यूमुळे त्याला सोडावी लागते आहे. इथून निघता निघता, मॅक्स स्ट्रीचर, मीनाक्षी सेनगुप्ता, नरेंद्र यादव, पराग सोनारघरे, प्रशांत पांडे आणि टी. व्यंकण्णा यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन या गॅलरीत भरतं आहे.

या गॅलरीबद्दल एवढी हळहळ का वाटावी आणि त्यासाठी ‘लोकसत्ता’ची एवढी जागा का घालवावी, याबद्दल शंका असलेल्यांनीही येत्या आठवडय़ाभरात (रविवार-सोमवार वगळता) प्रत्यक्ष गॅलरीत जाऊन मग फेरविचार करायला हरकत नाही.

पण दुसरीकडे, नेमकी आजच मुंबईत दुसरी गॅलरी उमलते आहे!

 तीही अवाढव्यच. तीन मजली!

‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’ या संस्थेची स्वतंत्र इमारत वांद्रे रेक्लमेशन भागात, ‘रंगशारदा’च्या अगदी समोरच उभी राहिली आहे आणि या जागेतलं दुसरं प्रदर्शन १४ जुलैपासनंच सुरू होतं आहे. पहिलं, उद्घाटनपर प्रदर्शन या संस्थेच्या सदस्य-कलावंतांचा इतिहास सांगणारं होतं; तर ताजं प्रदर्शन मुंबईतली (आणि भारतातली) व्यक्तिचित्रण-परंपरा दाखवणारं आहे. बाबुराव पेंटर, रावबहादूर धुरंधर, एस. एल. हळदणकर, शंकर पळशीकर, बाबुराव सडवेलकर, संभाजी कदम, मधुकर वंजारी, मनोज साकळे, प्रकाश सोनावणे अशा पाच पिढय़ांतल्या चित्रकार-शिल्पकारांनी केलेलं व्यक्तिचित्रण इथं २७ जुलैपर्यंत दिसणार आहे. त्यातूनच, ‘व्यक्तिचित्रा’च्या संकल्पनांत कसा बदल होत गेला हेही दिसणार आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटनपर कार्यक्रम म्हणजे, चित्रकार वासुदेव कामत हे नाना पाटेकर यांचं प्रत्यक्ष व्यक्तिचित्रण करतील. काही कारणानं ज्यांनी या इमारतीतलं पहिलं प्रदर्शन पाहिलं नसेल, त्यांनी आता दुसऱ्या प्रदर्शनाला तरी जरूर जावं आणि ‘चित्रकलेतलं काही कळत नाही’ म्हणणाऱ्यांनी किमान, चित्रकलेसाठी केवढी मोठ्ठी इमारत उभी राहिलीय हे तरी जाऊन पाहावंच!

अमूर्त पावसाळा..

‘जमात आर्ट गॅलरी’ आणि ‘ताओ आर्ट गॅलरी’ या गॅलऱ्यांमध्ये पावसाळ्यानिमित्त खास, अमूर्त चित्रांची प्रदर्शनं लागली आहेत. कुलाब्याला गेटवे ऑफ इंडिया परिसरातच ‘गोकुळ’, ‘बडेमियाँ’ आणि ‘बगदादी’ ही खवय्या-पिवय्यांची आवडती खानपानगृहं असलेल्या आडव्या गल्लीत ‘जमात’ आहे.. याच गॅलरीत नेहमी चित्रं दाखवणारे कृष्णा पुलकुंडवार, सुधीर तळमळे आणि विकास मल्हार यांच्याखेरीज पांडुरंग ताठे, जर्मनीच्या मारिआ-मारिका कोनिग आणि ज्येष्ठ अमूर्त चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या चित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे. कोलते यांची इथली काही चित्रं मोठय़ा स्केचबुकातल्या पानांवर काढल्यासारखी आहेत. अन्य चित्रकारांपैकी कोनिग आणि ताठे यांची चित्रं एकाच रंगाला किंवा एकाच रंगाला महत्त्व न देता प्रयोग करत राहणारी आहेत.

वरळीला अ‍ॅनी बेझंट मार्गावर (नेहरू प्लॅनेटोरियमच्या जवळ) ‘सर्जन प्लाझा’ नावाच्या इमारतीत तळघर आणि तळमजला व्यापणाऱ्या ‘ताओ आर्ट गॅलरी’मध्ये खुद्द गॅलरीमालक कल्पनाबेन शहा यांच्याही चित्रांचा समावेश प्रदर्शनात असल्याचं नवल वाटेल, पण ते नवख्यांनाच. सय्यद हैदर रझा, अकबर पदमसी, रवी मंडलिक, दिवंगत विजय शिंदे, भोपाळचे युसुफ, अन्वर, हे चित्रकार अशा एकंदर पंचवीसेक चित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 3:10 am

Web Title: wolt gallery in colaba
Next Stories
1 अवजड वाहनांना ठाणे बंद
2 आता ‘उपवास’ही खिशाला सोसवेना!
3 मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना पोळीभाजीऐवजी जंक फूड
Just Now!
X