देशातील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढत असले तरी उच्च शिक्षण आणि नोकरीतील प्रमाण मात्र फारच कमी आहे. अनेकदा इच्छा असूनही काही उपलब्ध संधींची माहिती नसणे, इतर सामाजिक आणि घरगुती मर्यादांमुळे महिलांना ते काम करणे शक्य होत नाही. यामुळे महिलांना स्वयंसिद्ध बनविण्यासाठी त्यांना करिअर घडविताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये या उद्देशाने मूळच्या उत्तर प्रदेशच्या आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदवीधर झालेल्या सैरी चहल यांनी https://sheroes.in हे संकेतस्थळ सुरू करून या माध्यमातून महिलांच्या करिअरला दिशा देण्यास सुरुवात केली आहे.

देशात आज प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानाधारित झाली आहे. अगदी संदेश पोहचवण्यापासून एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यापर्यंत सर्वच गोष्टी तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. याच तंत्रज्ञानाचा वापर करून करिअरपासून वंचित असलेल्या महिलांना संधी देण्यासाठी होऊ शकतो, असे चहल यांना वाटले आणि त्यांनी या संकेतस्थळाची निर्मिती केली. मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या चहल यांनी पालकांच्या नोकरीमुळे लहानपणात पंजाब, हरयाणा येथे जाणे झाले. तेथे छोटय़ा शहरांतील तसेच गावांतील महिलांना खूप काही करण्याची इच्छा असते पण संधी उपलब्ध नसल्यामुळे तसेच संधींची माहिती नसल्यामुळे त्यांना काही करता येणे शक्य होत नाही. यामुळे अशा महिलांसाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत राहिले. त्यातूनच या संकेतस्थळाचा जन्म झाला.

या संकेतस्थळात महिलांना विविध नोकरीच्या संधींची माहिती देण्यात आलेली आहे. यात कॉर्पोरेटमधील नोकऱ्या, घरून काम करण्याच्या संधी, व्यवसायाच्या संधी, मुक्तपद्धतीने काम करण्याच्या संधी, इंटर्नशिप, स्वयंसेवक आदी संधींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याशिवाय संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध संस्थांच्या मदतीने महिलांना करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनार किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामधून महिलांना विविध कौशल्य विकासाचा तपशील उपलब्ध करून दिला जातो. याचबरोबर संकेतस्थळावर टॉकशॉप नावाचा एक विभाग आहे, ज्यामध्ये महिलांच्या यशोगाथांपासून ते महिलांच्या समस्या, देशभरातील महिलांनी सुरू केलेली आंदोलने, महिलांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणारी उपकरणे आदींचा तपशीलही दिला जातो. याचबरोबर या संकेतस्थळावर विविध महिलांचे ब्लॉग्ज, विविध अभ्यासक्रमांच्या नोंदी आदी तपशीलही देण्यात आलेला आहे. यामुळे हे संकेतस्थळ महिलांना करिअर निवडीपासून त्यातील अडचणींवर पर्याय म्हणूनही अगदी उपयुक्त ठरू शकते, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.

सध्या देशात खूप चांगले ग्राहक उपलब्ध असून त्याचा फायदा नवउद्यमींना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवउद्यमींना सल्ला

आत्तापर्यंत तीन नवउद्योग सुरू करणाऱ्या चहल यांनी नवउद्यमींना सल्ला देताना सांगितले की, न घाबरता उद्योग सुरू करा. एकदा का उद्योग सुरू केला की आपला एक दिवस खूप चांगला जातो तर एखादा दिवस खूप वाईट जातो. या सर्वात न डगमगता पुढे जात राहायचे.

असा येतो पैसा

या व्यवसायासाठी चहल यांनी सुरुवातीला स्वत:कडचे पैसे गुंतवले. यानंतर त्यांनी पैसे उभारणीसाठी गुंतवणूक फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला. त्यातून त्यांना बिनित राजन, राघव बहल, ५०० स्टार्टअप्स यासारख्यांकडून निधी मिळाला. हे संकेतस्थळ महिलांसाठी मोफत असून त्याचा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे या संकेतस्थळाच्या माध्यमातून ज्या कंपन्यांना कामासाठी महिला मिळतात त्या कंपन्या संकेतस्थळाच्या वर्गणीदार होतात. यातून कंपनीला उत्पन्न होत आहे.

भविष्यातील वाटचाल

सध्या देशभरातील पाच हजार ठिकाणांहून सुमारे साडे सात लाख महिला संकेतस्थळाशी जोडलेल्या आहेत. संकेतस्थळाशी जोडल्या गेलेल्या कंपन्यांची संख्या वाढून महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले. यापूर्वी १९९९-२०००मध्ये जेव्हा पहिल्यांदा कंपनी सुरू केली, तेव्हा या कंपनीला स्टार्टअप म्हणतात हेही माहिती नसल्याचे चहल यांनी सांगत सध्या देशात नवउद्यमींसाठी पोषक वातावरण असून याचा फायदा उद्योगांना होणार असल्याचे नमूद केले.

Niraj.pandit@expressindia.com

चूकभूल

मागील आठवडय़ातील सदरात देस्ता ग्लोबल या नवउद्योगाची ओळख करून देण्यात आली होती. यात ही कंपनी देस्ता मार्टच्या माध्यमातून दहा टक्के सवलत देऊन थेट शेतकऱ्यांना उत्पादने विकते, असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र ही कंपनी सवलत न देता संकेतस्थळावरील विक्रेते सवलत देतात आणि कंपनी थेट शेतकऱ्यांना उतपादन विकत नसून शेती उत्पादनांची विक्री करणाऱ्यांना उत्पादन विकते.