लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करून स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालणारे काही कमी नाही. काही दिवसांपूर्वी हार्बर रेल्वे मार्गावर स्टंटबाजी करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अटक केलं होतं. याला एक महिना उलटत नाही तोच हार्बर मार्गावरील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हार्बर रेल्वेच्या रे रोड स्थानक परिसरात धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे.

गेल्या आठवड्यातला हा व्हिडिओ असून संबधित महिला ही हार्बर रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होती. डब्यात प्रवासी नसतानाही फुटबोर्डवर उभी राहून ही महिला स्वत:चा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत होती. पहिल्यांदाच धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. या महिलेचा शोध आता पोलीस घेत आहे.

स्टटंबाजी करत ती मार्गात येणाऱ्या खांबांना स्पर्श करत होती. ट्रेन कॉटन ग्रीन स्थानकात थांबण्याआधीच ती उडी मारुनही निघून गेली. लोहमार्ग पोलिस रे रोड आणि कॉटन ग्रीन स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहे.