News Flash

तिकीट लिपिक महिलेचे निलंबन

रेल्वेने स्वत:हून या महिला कर्मचाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई केली.

प्रवाशांशी भांडल्याच्या चित्रफितीमुळे कारवाई *  लोकमान्य टिळक टर्मिनसवरील घटना
तिकीट काढणारे प्रवासी आणि तिकीट खिडकीवरील कर्मचारी यांच्यातील तंटय़ाच्या घटना नेहमीच्याच असताना रविवारी घडलेल्या एका घटनेची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट खिडकीवर एक महिला तिकीट आरक्षण लिपिक आणि प्रवासी यांच्यात झालेल्या भांडणाची चित्रफीत समाजमाध्यमांवर वेगाने पसरली आणि रेल्वेने स्वत:हून या महिला कर्मचाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई केली. आता या प्रकरणाची चौकशी होणार असून त्यात संबंधित महिला दोषी आढळल्यास तिच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसहून लांब पल्ल्याच्या गाडीचे अनारक्षित तिकीट काढण्यासाठी दोन प्रवासी तिकीट खिडकीवर गेले. त्या वेळी खिडकीवर असलेली महिला तिकीट आरक्षण लिपिक जमा झालेले पैसे मोजत होती. खिडकीसमोर प्रवाशांची रांग असताना त्यांना तिकीट द्यायचे सोडून ही कर्मचारी पैसे मोजत असल्याचे पाहून प्रवासी संतप्त झाले. त्यांनी या महिलेला याबाबत जाब विचारला असता वादावादी झाली. या वादावादीचे पर्यवसान भांडणात होऊन त्या महिला कर्मचाऱ्याने तिकीट खिडकी काही क्षणांसाठी बंद केली.
संबंधित प्रवाशांनी या सर्व घटनेचे चित्रीकरण करत ही चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकली. काही क्षणांतच ही घटना वाऱ्यासारखी पसरली. अखेर रेल्वे प्रशासनालाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. कामाच्या वेळात तिकीट विक्रीतून जमा झालेले पैसे मोजणे, हा काही गुन्हा नाही. मात्र त्यानंतर त्या महिला कर्मचाऱ्याने प्रवाशांशी केलेले वर्तन वरकरणी अयोग्य दिसत आहे. त्यामुळे या प्रवाशांनी तक्रार दाखल न करताही रेल्वेने या प्रकरणी स्युओ मोटो दाखल केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली असून आता रेल्वे या प्रकरणाची चौकशी करणार आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी काय करता येईल, याबाबतही रेल्वे विचार करत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 5:42 am

Web Title: woman clerk suspended over tiff with cr commuter
Next Stories
1 मुंबईकरांना थंडीची आणखी प्रतीक्षा
2 सध्याचा काळ असहिष्णुतेचा!
3 स्मारक बंगल्यात नको- राज
Just Now!
X