शौचालयाच्या एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर या महिलेचा मृतदेह शोधून काढण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते.
 कल्पना पिंपळे (४५) ही महिला ट्रॉम्बेच्या साईबाबा चाळीत दोन मुलांसह रहाते. गेल्या वर्षी तिच्या पतीचे निधन झाले होते. महाराष्ट्र नगर येथील सार्वजनिक प्रसाधनगृहात ही महिला बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गेली होती. काही वेळानंतर अचानक ती बसलेल्या शौचालयाचा भाग कोसळला. यावेळी झालेला आवाज ऐकून त्या ठिकाणच्या इतर महिला मदतीला धावल्या. या शौचालयाचा कमोड कोसळून ती महिला खालील सेफ्टी टॅंकच्या आत पडली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु सेफ्टी टॅंक रिकामे करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री केवळ पालिकेकडे होते. दोन तासांनी पालिकेचे कर्मचारी यंत्रसामुग्रीसह पोहोचले आणि सेफ्टी टॅंक रिकामा करून या महिलेचा शोध सुरू करण्यात आला. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर पिंपळे यांचा मृतदेह २० फूट खोल टॅंकच्या तळाशी आढळला. तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 मानखुर्द पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी चौकशी करून जबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले.