पेस्ट कंट्रोल की पॅण्ट्री कारमधील बिर्याणी कारणीभूत?

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील विश्रांतीगृहात थांबलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, तिच्या पतीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. काही दिवसांपूर्वी या खोल्यांमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. तसेच त्रास होण्याआधी या दोघांनीही रेल्वेच्याच पॅण्ट्री कारमधून घेतलेली बिर्याणी खाल्ली होती. त्यामुळे या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

मडगाव-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस मांडवी एक्स्प्रेसने हे दाम्पत्य २२ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता मुंबईला आले. त्यांनी या गाडीच्या पॅण्ट्री कारमधून बिर्याणी घेतली होती. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमधील विश्रांतीगृहात त्यांनी एक खोली आरक्षित केली होती. या खोलीत त्यांनी बरोबर आणलेली बिर्याणी खाल्ली. मात्र, थोडय़ा वेळाने त्यांना मळमळू लागले आणि अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी खोली बदलून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करून त्यांना खोली बदलून देण्यात आली. दुसऱ्या दिवशीही त्यांचा त्रास थांबला नाही आणि या दोघांनाही उलटय़ा होऊ लागल्या. दरम्यान दुपारी उलटी झाल्यानंतर महिला बेशुद्ध पडल्यानंतर तिच्या पतीने तातडीने रेल्वे कर्मचाऱ्याला बोलावून घेतले. त्यानंतर उप स्टेशन अधीक्षकांच्या मदतीने या महिलेला सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ही महिला मृत्युमुखी पडल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर तिच्या पतीला दाखल करून घेत उपचार सुरू केले.

विश्रांती कक्षात १२ ते १६ एप्रिल यांदरम्यान पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आणखी एका प्रवाशालाही या कक्षात असाच त्रास झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांतर्फे देण्यात आली.