मुंबईतील नेव्ही नगर भागात लिफ्टमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी नौदल वसाहतीत ही घटना घडली. आरती परदेशी असं या महिलेचं नाव आहे. कफ परेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती परदेशी या नौदलाच्या कुलाबा या ठिकाणी असलेल्या वसाहतीत कुटुंबीयांसोबत वास्तव्य करत होत्या.

सोमवारी सकाळी आरती परदेशी या विजया अपार्टमेंटमध्ये असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये काम करण्यासाठी गेल्या. दुपारी १२ च्या सुमारास त्या पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. लिफ्ट आली, लिफ्टमध्ये जात असताना कुत्रा लिफ्टमध्ये गेल्या. मात्र आरती परदेशी लिफ्टमध्ये जाण्याआधीच लिफ्ट सुरु झाली. ज्यामुळे त्या लिफ्ट आणि भिंत याच्यामध्ये अडकल्या.

ही घटना रहिवाशांना समजताच त्यांनी तातडीने आरती यांना लिफ्टमधून सोडवलं. उपचारांसाठी त्यांना अश्विनी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिथेच त्यांना मृत घोषित केलं. रुग्णालय प्रशासनाकडून घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी परदेशी यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु केला आहे.