News Flash

उघड्या मॅनहोलमध्ये पडल्यानं महिलेला गंभीर इजा; पालिकेचा भोंगळ कारभार

सर्व कर भरा आणि विकतचं मरण पत्करा

| November 22, 2017 05:44 pm

नीलिमा पुराणिक (छायाचित्र सौजन्य- फेसबुक)

एखादा अपघात झाल्यावर मुंबई महापालिकेला खरंच जाग येते का, असा प्रश्न निर्माण होईल, अशी घटना मुंबईच्या मुलुंडमध्ये घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. मात्र एक डॉक्टर गमावूनही पालिका प्रशासनाला कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळेच आता अगदी तशीच एक घटना मुलुंडमध्ये घडली आहे. उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने नीलिमा पुराणिक नावाच्या महिलेला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर आज सर्जरीदेखील झाली आहे. आपलं जीवन सुसह्य व्हावं, यासाठी नीलिमा यांनी ज्या पालिकेकडे सर्व कर नियमित भरले, त्याच पालिका प्रशासनाने त्यांना मरणाच्या दाढेत ढकलून दिलं. मात्र त्या थोडक्यात बचावल्या.

मुलुंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नीलिमा पुराणिक काल (मंगळवारी) सकाळी ६ च्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळी अंधार असल्यानं मॅनहोल उघडा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे त्या जवळपास १० ते १२ फूट खड्ड्यात पडल्या. त्यावेळी तिथून मॉर्निंग वॉक करत असलेल्या आणि नीलिमा पुराणिक यांना ओळखणाऱ्या एका व्यक्तीच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्याच व्यक्तीने ही बाब नीलिमा यांच्या मुलाला फोन करुन कळवली. यानंतर नीलिमा यांना मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आलं. त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला गंभीर इजा झालीय. यासोबतच त्यांच्या पाठीच्या कण्यालादेखील दुखापत झाली. त्यामुळे पुढील सहा महिने त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे.

याबद्दल बोलताना नीलिमा यांचा मुलगा निखिलनं पालिका प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘जोपर्यंत एखादा राजकारणी किंवा त्याच्या घरातील एखादी व्यक्ती मॅनहोलमध्ये पडणार नाही, तोपर्यंत या परिस्थितीत काडीचाही फरक पडणार नाही,’ अशा शब्दांमध्ये निखिलनं त्याच्या भावना ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना व्यक्त केल्या. ‘सामान्य माणूस मॅनहोलमध्ये पडल्याने कोणालाही कसलाही फरक पडत नाही. डॉक्टरांनी आईला कंबरेसाठी दोन महिन्यांची विश्रांती सांगितली आहे. आमचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्यामुळे आता पुढील सहा महिने माझ्या घरातील परिस्थिती पूर्णपणे विस्कळीत होणारा,’ अशी व्यथा निखिलनं बोलून दाखवली.

मुंबई महापालिकेनं नेहमीप्रमाणे यावेळीही आपली जबाबदारी ढकलून दिलीय. पालिकेकडून मॅनहोलवर झाकण लावण्यात आलं होतं. मात्र ते चोरीला गेलं, अशी नेहमीची सारवासारव पालिकेनं केली. विशेष म्हणजे, पालिकेनं याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. मात्र ही तक्रार काल म्हणजेच नीलिमा पुराणिक मॅनहोलमध्ये पडल्यावर दाखल करण्यात आली. या दुर्घटनेआधी पालिकेला जाग आली असती, तर नीलिमा यांच्यासोबत दुर्घटनाच घडली नसती. मात्र पालिकेला सामान्य जनतेच्या जिवाची काय किंमत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. सर्व कर भरा आणि विकतचं मरण पत्करा, अशीच काहीशी अवस्था सध्या मुंबईकर जनतेची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 5:42 pm

Web Title: woman falls into open manhole in mumbais mulund
Next Stories
1 भोईवाडा न्यायालयात फिर्यादीचा आरोपींवर चाकूहल्ला
2 शिक्षण विभागाचे सर्व ‘शिक्षा’ अभियान!
3 शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र?
Just Now!
X