घाटकोपर येथील महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. बुधवारी सकाळी घाटकोपर-अंधेरी लिंक रोडजवळ या महिलेचा मृतदेह आढळला होता. ही महिला कचरा वेचून आपली उपजीविका चालवत असे.  तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले होते. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार, अनैसर्गिक संभोग आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या विशेष पथकात परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, चार पोलीस निरीक्षक, दोन साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी अशाच पद्धतीने एका कचरा वेचणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यामुळे या प्रकरणातही ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करीत आहेत.