दादर रेल्वे स्थानकातील घटना, आरोपीला अटक

मुंबई : के वळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू असताना दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशाच एका घटनेत भ्रमणध्वनी चोराला पकडण्याच्या नादात धावत्या लोकलमधून उतरताना तोल गेल्याने महिला प्रवासी जखमी झाली. या घटनेत त्यांच्या पाठीच्या कण्याला जबर मार लागला. या प्रकरणातील आरोपीला काही तासांतच लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. चोरीच्या घटनांमुळे भुरटे चोरही आता लोकलमध्ये शिरकाव करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

विरार येथे राहणाऱ्या ३० वर्षीय स्नेहल हुलके  या पश्चिम रेल्वेत कनिष्ठ अभियंता या पदावर नुकत्याच रुजू झाल्या आहेत. ७ जुलैला स्नेहल यांनी दुपारी ३.४० वाजता विरार स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. मोटरमनच्या केबिनलगतच असलेल्या द्वितीय वर्गाच्या डब्यात दरवाजाजवळच असलेल्या आसनावर बसून त्या प्रवास करीत होत्या. ही लोकल दुपारी ४.४० वाजता दादर स्थानकातील फलाट क्रमांक चारवर थांबली. लोकल चर्चगेटच्या दिशेने सुटत असतानाच एक इसम त्या डब्यात चढला व स्नेहल यांच्या हातातील भ्रमणध्वनी खेचून त्याने फलाटावर उडी मारली.

आरोपीला पकडण्यासाठी स्नेहल धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांचा तोल गेला व त्या खाली पडल्या. तात्काळ प्रवाशांनी पोलिसांना बोलावले व त्यांना उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील जगजीवनराम रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले व पोलिसांची दोन पथके  नेमली. यातील आरोपी राहुल बुटिया असून तो दादर पश्चिमेला राहात असल्याचे समजले. तो वास्तव्य करत असलेल्या ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी हस्तगत केला. स्नेहल हुलके यांची प्रकृती स्थिर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. इनामदार यांनी सांगितले.

भ्रमणध्वनी चोरीच्या घटना

२०२१ मध्ये आतापर्यंत १,२०० हून अधिक भ्रमणध्वनी चोरीच्या घटना मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर झाल्याची नोंद आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० पर्यंत भ्रमणध्वनी चोरीच्या पाच हजारांहून अधिक घटना घडल्या.