मुंबई : तिळे असलेल्या महिलेला २४ व्या आठवड्यात गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे. ४१ वर्षांच्या या महिलेला मानसिक आरोग्याच्या कारणास्तव पूर्ण गर्भपातास परवानगी दिल्याचे न्यायालयाने आदेशात प्रामुख्याने नमूद केले.

या महिलेला मानसिक आजार आहे. शिवाय तिळ्यांमघील एका गर्भाच्या डोक्याचा भाग विकसितच झालेला नाही. त्यामुळे ते त्याच अवस्थेत जन्माला येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने या महिलेच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश जे. जे. रुग्णालयाला दिले होते. तसेच एकाच बाळाबाबत गर्भपात शक्य आहे का, अशी विचारणा केली होती. त्यानंतर तीन बाळांसह पूर्ण गर्भपाताबाबत नव्याने अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार या महिलेची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यात पहिल्या गर्भाला मेंदूची समस्या असून हे बाळ जन्मल्यावर जगण्याची शक्यता कमी आहे वा जन्मानंतर काहीच दिवस जगू शकेल.  शिवाय पहिल्या बाळात व्यंग असल्याने दुसऱ्या बाळातही ते असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बाळही जन्मले तर त्याला गंभीर शारीरिक व्यंग आणि अन्य आजार असतील.