मुंबई : वाहन पार्क करताना चूक झाल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. गीयर ऐवजी एस्कलेटरवर पाय पडल्यामुळे कार वेगाने पुढे येऊन तिची धडक पत्नीला बसली आणि त्यात पत्नीचा मृत्यू झाला. सुधाकर सारंग असे या उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर पत्नी स्मीता यांच्या मृत्यूसंदर्भात ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सारंग अंमलीपदार्थविरोधी पथकात नेमणुकीस होते. बहुचर्चित बेबी पाटणकर प्रकरणात ते निलंबीत आहेत. २६ जानेवारीला दुपारी बाराच्या सुमारास ते, पत्नी आणि दोन मुलांसह दक्षिण मुंबईतल्या सेंट्रल मॉल येथे गेले होते. वाहनतळावर कार पार्क करण्याच्या धडपडीत होते. पत्नी स्मिता यांना गुडघ्याचे दुखणे असल्यामुळे त्या दोन मुलांचा आधार घेऊन समोर उभ्या होत्या. पार्क करण्याच्या प्रयत्नांत त्यांचे वाहन त्यांची कार एका वाहनाला घासली गेली. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. रिव्हर्स गिअरऐवजी त्यांचा पाय एक्सलेटरवर पडला. कार वेगाने पुढे गेली आणि समोरच उभ्या असलेल्या स्मीता कार आणि वाहनतळाच्या भिंतीदरम्यान चिरडल्या गेल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला.  स्मिता यांना गुडघ्यांचा त्रास होता. कार वेगाने पुढे आली तेव्हा त्या हालचाल करू शकल्या नाहीत, असे ताडदेव पोलिसांनी सांगितले. आतापर्यंतच्या चौकशीतून सारंग यांची कृती हेतुपुरस्सर होती, असे संकेत देणारी माहिती पुढे आलेली नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.