प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने हत्या केल्यानंतर किचनमध्येच पतीचा मृतदेह पुरला होता. सहा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यांसमोर हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी तपासादरम्यान चौकशी केली असताना मुलीने पोलिसांसमोर सगळा घटनाक्रम उलगडला. रईस शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मुख्य आरोपी असणाऱ्या शाहिदा शेखचं २०१२ मध्ये रईस शेखसोबत उत्तर प्रदेशात लग्न झालं होतं.

नोकरीच्या शोधात हे दांपत्य मुंबईत आलं होतं. त्यांना सहा वर्षाची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी शाहिदा शेख आणि तिचा प्रियकर अनिकेत उर्फ अमित मिश्रा याला अटक केली आहे.

रईस शेखच्या हत्येनंतर ११ दिवसांनी मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. किचनमध्ये तीन फूट खट्टा खोदून पुरण्यात आलेला हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस जवळपास १२ तास खोदकाम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी शाहिदा शेख यांनी दहिसर पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. २१ मे रोजी पती घऱाबाहेर पडल्यानंतर पुन्हा घऱी परतले नसल्याचं तिने सांगितलं होतं. तेव्हापासून आपला त्याच्याशी संपर्क होत नसल्याचीही खोटी माहिती तिने दिली होती.

पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरु केला. २५ मे रोजी रईसचा भाऊ अनीस मुंबईत पोहोचला आणि दहिसर पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी त्याने शाहिदा वेगवेगळी माहिती देत असून ती काहीतरी लपवत असल्याची शंका व्यक्त केली. १ जूनला पोलीस रईसच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांना किचनमधील टाइल्स योग्य पद्धतीने लागल्या नसून, काही टाइल्स जागेवर नसल्याचं लक्षात आलं.

पोलिसांनी कठोरपणे चौकशी केली असताना शाहिदाने हत्या केल्याची आणि मृतदेह किचनमध्ये पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता तिनेदेखील जे काही पाहिलं होतं ते सर्व पोलिसांना सांगितलं. जर पोलिसांना सांगितलं तर तुलादेखील अशीच पुरुन टाकेन अशी धमकी आईने दिल्याचंही मुलीने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिदाने शेजारी अमित मिश्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली आहे. पती रईसला याची माहिती मिळाली होती. त्याने तात्काळ हे सर्व थांबवण्यास सांगितलं होतं. २२ मे रोजी शाहिदाने अमित मिश्रासोबत मिळून मुलीच्या डोळ्यांदेखत रईसची वायरीने गळा दाबून हत्या केली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तीन भाग केले. थोडा वेळ मृतदेह बाथरुममध्ये ठेवल्यानंतर त्यांनी तो किचनमध्ये पुरला होता.