नवऱयाच्या हत्येच्या आरोपातून पत्नीची आणि तिच्या कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. पत्नीने आपल्या तोंडात विषारी द्रव्य बळजबरीने ओतल्याचा मृत्यूपूर्वी पतीने दिलेला जबाब ग्राह्य न धरता न्यायालयाने उषा पवार आणि तिच्या नातेवाईकांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. 
उषा पवार त्यांचे पालक आणि तीन भाऊ यांच्यासह एकूण आठ जणांची खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. उषा पवार या सध्या कारागृहात आहेत. त्यांच्या सुटकेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर सध्या जामीनावर बाहेर सोडण्यात आलेल्या इतर आरोपींचे जामीनाचे बॉंड रद्द करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील राहणारे आहेत.
या प्रकरणात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात पोलिसांनी दोन दिवसांचा उशीर लावला. हा उशीर का झाला, याचे कोणतेही स्पष्टीकरण सरकारी पक्षाने आपल्या युक्तिवादावेळी दिलेले नाही. त्याचबरोबर न्यायालयापुढे साक्ष नोंदविणाऱयांनी उषा पवार यांचे पती विलास यांनी स्वतःच विषारी द्रव्य प्यायल्याची साक्ष दिलीये. त्याचमुळे उषा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची मुक्तता करण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.