मुंबई-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेसमध्ये उंदीर असल्याची तक्रार एका महिला वकिलाने ग्राहक न्यायालयात केली होती. याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने रेल्वेला चांगलंच फटकारलं असून महिलेला १९ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत.

वर्ष २०१५ मध्ये वकील शीतल कनकिया आणि त्यांच्या नातलग हेमा कनकिया यांनी मुंबई-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेसमध्ये उंदीर असल्याची तक्रार दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक न्यायालयात केली होती. याबाबत कनकिया म्हणाल्या, प्रवासादरम्यान जेव्हा उंदीर असल्याची तक्रार रेल्वेतील कर्मचाऱ्यांकडे केली तेव्हा एक्स्प्रेसमध्ये उंदीर असल्याची बाब सामान्य आहे. इतक्या मोठ्या ट्रेनची सफाई करण्यासाठी तीन दिवस मिळतात असं उत्तर मिळालं. त्यानंतर तिकीट निरीक्षकांकडेही लेखी तक्रार केली, पण त्यांनीही कोणताच प्रतिसाद दिला नाही, असं कनकिया यांनी सांगितलं.

याशिवाय, ट्रेनमध्ये दिलेल्या खराब जेवणामुळे प्रकृती बिघडली होती, त्यामुळे सुट्टी घ्यावी लागली आणि माझं नुकसान झालं त्यामुळे तिकीटाचे पैसे आणि मानसिक त्रास झाल्याची भरपाई देण्यात यावी, असा दावा कनकिया यांनी तक्रारीत केला. तररेल्वेने त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि त्यांनी केलेल्या सर्व तक्रारी चुकीच्या असून रेल्वेची स्वच्छता वेळेवर होत असते, शौचालय आणि पाण्याचाही तक्रारी चुकीच्या आहेत, असं उत्तर रेल्वेने दिलं. मात्र, न्यायालयाने रेल्वेचं म्हणणं मान्य केलं नाही आणि जर कामं केली तर कामांची नोंद का नाही, याउलट तक्रारदारांनी सर्व पुरावे सादर केले आहेत असं सुनावलं आणि नागरिकांनी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पैसे मोजले आहेत, मग त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, असंही न्यायालयानं बजावलं.