प्रभादेवी येथील ट्वीन टॉवर इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी मारून केतकी गवंडे (२८) या विवाहित महिलेने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आत्महत्या केली. मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केलेल्या केतकीच्या मृत्यूबाबत पती आणि आई-वडिलांनी संशय व्यक्त केलेला नाही, अशी माहिती दादर पोलीस देतात.

विवाहानंतर दोनच महिन्यांत केतकीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. प्राथमिक चौकशीत गेल्या सहा वर्षांपासून केतकी मानसिक तणावाखाली होती. तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार सुरू होते. त्याबाबत आई-वडील आणि पतीला पूर्ण कल्पना होती. जाहिरात कंपनीत काम करणारा पती सकाळी घरातून केतकीला आई-वडिलांकडे, ‘ट्विन टॉवर’मध्ये सोडत असे आणि कामावरून घरी परतताना तिला सोबत घेऊन जाई. तब्येत ठीक नसल्याने रविवारी पती केतकीच्या आईवडिलांकडेच वास्तव्यास होता. सोमवारी तो कामावर निघून गेला. दुपारी एकच्या सुमारास केतकीचे वडील कामावर जाण्यासाठी निघाले. घरी आई आणि मोलकरीण असताना केतकीने शयनगृहाच्या खिडकीतून खाली उडी घेतली. शीव रुग्णालयात उपचार घेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. केतकीच्या मृत्यूची माहिती ऐकल्यावर घरी परतलेल्या पतीने काही काळासाठी स्वत:ला स्वच्छतागृहात कोंडून घेतले होते. केतकीच्या मृत्यूप्रकरणी दादर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली आहे. प्राथमिक चौकशीतून संशयास्पद असे काही आढळलेले नाही. कुटुंब दु:खात आहे. त्यामुळे काही दिवसांनी संबंधित सर्वाचे जबाब नोंदवून घेतले जातील. प्राथमिक चौकशीत आई, मोलकरीण घरात असताना केतकीने खाली उडी घेतली, ती काही वर्षांपासून मानसिक तणावात होती, अशी माहिती पुढे आली; तसेच कुटुंबाने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही, असे वरिष्ठ निरीक्षक दिवाकर शेळके यांनी सांगितले.