वयोवु्द्ध महिलेला व्यायामासाठी प्रोत्साहन देऊन सोसायटी जीममध्ये जाण्यासाठी तयार केले. संबंधित महिलेला जीममध्ये नेऊन सोडल्यानंतर त्यांच्या फ्लॅटमधून ८ लाख रुपयांचे दागिने चोरणाऱ्या गृहिणीला मालाडमधून अटक करण्यात आली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांसोबत हा प्रकार घडला. ते प्रचंड घाबरले होते. तक्रार नोंदवायलाही तयार नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन समजावल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली. २० जून रोजी चोरीची ही घटना घडली.

गुन्हे अन्वेक्षण विभागाने मंगळवारी या गुन्ह्याची उकल केली. रुचिता सचिन तन्ना (३८) आणि ज्वेलर दीपक सारकारीया (४३) दोघांना अटक केली आहे. तन्नाकडून चोरीचे दागिने विकत घेतल्याप्रकरणी दीपक सारकारीयाला अटक करण्यात आली. मोठया प्रमाणावर जनजागृती करुनही ज्वलेर्स बेकायद सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात असे पोलिसांनी सांगितले.

२० जूनला पती कामासाठी घराबाहेर होते. त्यावेळी मी रुचिता तन्नासोबत सोसायटीच्या जीममध्ये गेले होते असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार महिलेची अलीकडेच सोसायटीत मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने रुचिता तन्नाबरोबर ओळख झाली होती. २० जून रोजी रुचिता तन्ना तक्रारदार महिलेसोबत जीममध्ये गेली होती.

महिला व्यायामामध्ये व्यस्त असताना रुचिता काऊंटरवरुन फ्लॅटच्या चाव्या घेऊन निसटली. रुचिताने फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्याजवळ असलेल्या चाव्यांनी तिजोरी उघडली व आठ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. कुठलाही संशय येऊ नये म्हणून रुचिता परत जीममध्ये आली. तक्रारदार महिलेच्या नवऱ्याने दुसऱ्या दिवशी कपाट उघडल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रुचिता तन्नाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. २०१० साली चोरीच्या गुन्ह्यात तन्नाला अटक झाली होती.