ढिगाऱ्याखालून १८ तासांनी जिवंत बाहेर काढलेल्या महिलेचा टाहो; ‘केसरबाई’च्या ढिगाऱ्याखाली डोळय़ांदेखत दोन मुलांचा मृत्यू

डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तब्बल १८ तासांनंतर जिवंत बाहेर पडलेली ३५ वर्षीय हलिमाबानो हिच्या अश्रूंचा बांध थांबत नव्हता. ‘काळजी करू नको, आपली मुले सुखरूप आहेत..’ अशा शब्दांत तिचा पती रशीद तिला धीर देत होता. पण ‘आप झूठ मत बोलो. मैने अपने नन्होंको मेरी गोदमें दम तोडते हुए देखा’, असे हलिमाबानो उत्तरली तेव्हा साऱ्यांचाच जीव हेलावला.

डोंगरी परिसरातली केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या हलिमाबानो हिला बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बाहेर काढले गेले. हलिमाबानो वाचली असली तरी तिची दोन मुले मात्र मरण पावली.

शिलाई काम करणाऱ्या रशीद यांनी उत्तर प्रदेश येथील गावी राहणाऱ्या पत्नी हलिमाबानो (३५) आणि मुले अरबाज (७), शहझाद (८) यांना दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आणले होते. मंगळवारी सकाळी रशीद कामावर गेले आणि दहा मिनिटांतच ही घटना घडली.

बुधवारी रात्री दीडच्या सुमारास ढिगाऱ्याखाली कोणीतरी जिवंत असल्याचे राष्ट्रीय आपत्कालीन बचाव पथकाच्या जवानांच्या लक्षात आले. हलिमाबानोला बाहेरचे सर्व ऐकू येत होते, पण तिचा आवाज मात्र कोणालाही ऐकू येत नव्हता. त्यामुळे ती अडकल्याचे उशिरा लक्षात आले. ती अडकलेल्या ढिगाऱ्यावर मोठे लोखंडी खांब होते. हे खांब ओढले तर त्यावर असलेला संपूर्ण ढिगारा खाली कोसळण्याची शक्यता होती. त्यात पाऊसही जोरदार सुरू होता. त्यामुळे ढिगारा काढणे अवघड जात होते. साडेतीनच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर जवानांनी लोखंडी खांब एका बाजूला ओढले आणि ढिगारा बाजूला केला. हलिमाला तात्काळ जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. हलिमाच्या दोन्ही बाजूला तिची दोन्ही मुले अरबाज आणि शहझाद यांचे मृतदेह आढळले.

हलिमाच्या उजव्या हाताला गंभीर मार लागला असून पायालाही दुखापत झाली आहे. रशीदसह अन्य काहींनी सतत रडणाऱ्या हलिमाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मुलांनी माझ्या कुशीत प्राण सोडला, हे तिचे उद्गारच अनेकांच्या जिवाचा थरकाप उडवत होते.

पतीच्या आग्रहाखातर मुक्काम लांबला

रशीद यांनी आपल्या पत्नीला गावावरून मुंबईला आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईने, हलिमाच्या सासूने त्यांना विरोध केला. तरीही रशीद पत्नी व मुलांना घेऊन मुंबईत आले. खुद्द हलिमालाही मुंबईच्या वातावरणाचा कंटाळा आला होता. आम्हाला गावी पाठवा, म्हणून त्यांनी आठवडाभरापासून रशीदा यांच्या मागे धोशा लावला होता. त्यांच्या आग्रहानंतर रशीद यांनी गावी परतण्यासाठी रेल्वेचे तिकीटही काढले होते. परंतु त्याआधीच या कुटुंबावर आघात झाला.

मुलांचे मृतदेह गावी

रुग्णालयात जखमी अवस्थेत असलेल्या हलिमाकडे लक्ष देणे, तिला समजावणे आणि दुसरीकडे मुलांचे मृतदेह ताब्यात घेणे यांमुळे रशीद यांची बुधवारी धावपळ सुरू होती. बुधवारी साडेचारच्या सुमारास मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले. मात्र बायकोला अशा अवस्थेत सोडून मुलांच्या अंत्यविधीला जाणेही शक्य नसल्याने त्यांची घालमेल सुरू होती. अखेर विमानाने त्यांनी भावासोबत मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे रवाना केले.