बारा दिवसांपुर्वी शिवाजी नगरमध्ये ड्रममध्ये आढळलेला तो मृतदेह एका सेक्स वर्करचा असल्याचं समोर आलं आहे. मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी केसचा छडा लावला असल्याची माहिती दिली असून, याप्रकरणी ६० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याची पत्नी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी बाबू पटेल बांधकाम व्यावसायिक असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पीडित महिलेचं नाव मीना असून दादरमध्ये सेक्स वर्कर म्हणूम काम करत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

११ मे रोजी एका ड्रममध्ये कुजलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. पोस्टमॉर्टम केलं असता महिलेची हत्या झाली असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु केला होता. तपासादरम्यान, हा ड्रम टेम्पो ड्रायव्हरने त्या ठिकाणी आणून ठेवला असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

“तपासादरम्यान पोलिसांना टेम्पोचा नंबर मिळवण्यात यश आलं. टेम्पो ड्रायव्हरची चौकशी केली असता आपल्याला एका वयस्कर व्यक्तीने वाशीहून हा ड्रम डिलिव्हर करण्यास सांगितलं होतं अशी माहिती दिली”, असं शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांनी सांगितलं आहे.

ड्रम वाशीला पोहोचवण्यासाठी अजून एक टेम्पो वापरण्यात आल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या टेम्पोचा शोध सुरु केला. अखेर पोलीस नवी मुंबईच्या सीवूडला पोहोचले.

खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही आरोपी पटेलची चौकशी केली. त्याने तपासात हत्येची कबुली दिली. हत्या केल्यानंतर काही दिवस मृतदेह घरातच ठेवला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पत्नीच्या उपस्थितीत आपण हत्या केल्याचंही आरोपीने सांगितलं आहे. मात्र हत्येमागचं कारण सांगण्यास त्याने नकार दिला आहे. पोलीस सध्या आरोपीच्या पत्नीचा शोध घेत आहेत.