News Flash

हृदयविकार आणि करोनाग्रस्त महिलेला तिळे

नायर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

प्रातिनिधिक फोटो

संदीप आचार्य

एका करोनाबाधित आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या महिलेने नायर रुग्णालयात तिळ्या मुलांना जन्म दिला असून, आई व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वांद्रे येथील रहिवासी यशोदाबेन नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या असता त्या करोनाबाधित असल्याचे आढळून आले. मुळात त्यांचे हृदय कमकुवत होते. त्यात करोनाची लागण झाल्याने डॉक्टरांनी मोठय़ा रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांना दिला.

त्यांच्या कुटुंबीयांनी मोठय़ा रुग्णालयांशी संपर्क साधायला सुरुवात केली असता त्यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. शेवटी त्यांना तब्बल सात पंचतारांकित रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथेही नकार मिळाल्यानंतर अखेरचा उपाय म्हणून त्या नायरमध्ये आल्याचे अधिष्ठाता रुग्णालयाचे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

स्त्री-रोग विभागाच्या प्रमुख डॉ. अरुंधती यांच्या पथकाने तातडीने त्यांना विभागात हलवले आणि हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. अजय चौरसिया यांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. रात्री

उशिरा त्यांना शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. यशोदाबेन यांच्या हृदयाचे कार्य केवळ २० टक्के सुरू होते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे हे एक मोठे आव्हान होते. अ‍ॅनेस्थेशिया विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता देशपांडे, डॉ. अरुंधती आणि हृदयविकार विभागाच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून हे आव्हान यशस्वीपणे पेलले.

५३ करोनाबाधित महिलांची प्रसूती

आतापर्यंत एकूण ५३ करोनाबाधित महिलांचे यशस्वीपणे बाळंतपण करण्यात आले असून यातील दहा महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. करोनाच्या लढाईत नायर रुग्णालयातील प्रत्येक विभाग जिवाची बाजी लावून काम करत असून तिळ्यांचा सुखरूप जन्म झाल्याने नायरच्या डॉक्टरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:36 am

Web Title: woman with heart disease and corona gives birth to three babies abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बदल्यांचे वादळ
2 अंतिम वर्ष वगळता विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द
3 एक लाख ऊसतोड मजुरांचे सुरक्षित स्थलांतर
Just Now!
X