मुंबईतील  प्रसिद्ध आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वरळी येथील हाजी अली दर्ग्यात मंगळवारी ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे. चार वर्षाच्या कायदेशीर लढ्यानंतर सुमारे ८० महिलांनी दर्ग्यात प्रवेश केला आहे.

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेशास असलेली बंदी उठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्टरोजी दिला होता. भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेच्या झाकिया सोमण व नूरजहाँ नियाझ या महिलांनी केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली होती. पूर्वी महिलांना दर्ग्यातील मजारीजवळ जाऊ देण्यात येत होते, मात्र २०११ सालानंतर त्यावर बंदी घालण्यात आली, असा महिला संघटनांचा युक्तिवाद आहे. तर दुसरीकडे तृप्ती देसाई यांनीदेखील आंदोलन छेडले होते. या याचिकेवर हायकोर्टाने ऑगस्टमध्ये निकाल देताना महिलांना मजारपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय दिला होता. महिलांना प्रवेशबंदी राज्यघटनेच्या कलम १४, १५ आणि २१ मधील तरतुदींच्या विरोधात आहे. त्यामुळे ती आम्ही रद्द ठरवत असल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले होते. या निर्णयाविरोधात हाजी अली ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने शेवटी हाजी अली ट्रस्टने महिलांना मजारपर्यंत प्रवेश देण्यास विरोध नसल्याचे सांगितले होते. यासाठी ट्रस्टने २ महिन्यांचा अवधी मागितला होता.

मंगळवारी भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या संघटनेच्या नेतृत्वाखाली महिलांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला. महिलांनी सर्व प्रथम हाजी अलीला चादर आणि फुल अर्पण करत शांततेसाठी प्रार्थना केली. ट्रस्टींनीही या महिलांसाठी विशेष सोय केली होती. या महिलांनी नंतर चहापानही घेतला. तृप्ती देसाई यांनीदेखील या ऐतिहासिक घटनेचे स्वागत केले आहे. आम्ही दिलेल्या लढ्याला यश मिळाले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.