गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक आणि धार्मिक विधींसोबत सामाजिक स्तरावरदेखील स्त्रीशक्ती जागवण्याचे आणि स्त्रियांना स्वावलंबी व सबळ बनविण्याचे अनेक कालसुसंगत उपक्रम सुरू झाले आहेत. या प्रयत्नांमध्ये मिठाचा खडा टाकणारी ‘विमेन अगेन्स्ट फेमिनिझम’ नावाची एक ऑनलाइन चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीद्वारे काही स्त्रियाच स्त्रीवादाला विरोध करीत आहेत. ‘मॉडर्न डे फेमिनिझम’ला विरोध करण्यासाठी ही चळवळ पाश्चिमात्य देशातील तरुणींनी उचलून धरली आणि आता आपल्याकडेही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ती तरुणींचे लक्ष वेधत आहे.
#WomenAgainstFeminis या नावाचा ट्विटर हॅशटॅग सध्या गाजत आहे. या ऑनलाइन चळवळीचे स्वरूप तसे साधेच आहे. ‘आय डोण्ट नीड फेमिनिझम बिकॉझ..’ या वाक्याने सुरुवात करून आपण कोणत्या कारणासाठी स्त्रीवादाला विरोध करीत आहोत हे एका जाड कागदावर हाताने लिहायचे आणि तो फलक हातात धरून स्वत:चा फोटो काढायचा. हा फोटो सोशल साइटवर अपलोड करायचा. सुरुवातीला ब्लॉगच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली. सध्या टम्बलर, फेसबुक, ट्विटर आणि यूटय़ूबवर ही चळवळ सुरू आहे. ‘मी समर्थ आहे, मला आधुनिक स्त्रीवादाची आवश्यकता वाटत नाही’, अशा अर्थाचा संदेश लिहिलेल्या स्त्रियांची अनेक छायाचित्रे सध्या फेसबुक, यूटय़ूब आणि ब्लॉगवर गाजत आहेत.
या चळवळीला जुलै २०१३मध्ये अमेरिकेत सुरुवात झाली. तिथल्या प्रसारमाध्यमांमध्येही त्याचे पडसाद उमटले. स्त्री अबला आहे, या तत्त्वावरच स्त्रीवादी चळवळ सुरू झाली आणि आताच्या आम्हा आधुनिक आणि समर्थ स्त्रियांना याची गरज नाही, असा सूर या चळवळीतील स्त्रियांनी आळवला आहे.