आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून मुंबईत प्रादेशिक विमानतळावर जाण्याची कसरत एका महिलेला चांगलीच महागात पडली. ही महिला सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सांताक्रुझ देशांतर्गत विमानतळावर रिक्षाने जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या महिलेच्या हातातील बॅग घेऊन पोबारा केला. सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत या महिलेच्या बॅगेतील १३ लाख रुपयांचे दागिने, २५ हजार रुपये रोख, महिलेचे पारपत्र असा ऐवज चोरीला गेला. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली सबरवाल गोव्याहून भोपाळला चालल्या होत्या. गोव्याहून थेट विमान नसल्याने त्या मुंबईला आल्या. त्यांचे विमान सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यांचे पुढील विमान मुंबईच्या देशांतर्गत विमानतळावरून पहाटे साडेपाच वाजता सुटणार होते. त्यासाठी त्यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळावर येण्यासाठी रिक्षा केली. या वेळी दोघे दुचाकीवरून आले आणि त्यांनी रिक्षात बसलेल्या सोनाली यांच्या हातातील बॅग हिसकावत पळ काढला. रिक्षाचालकाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही.