विरार-चर्चगेट लोकलमध्ये मंगळवारी महिलांच्या एका टोळक्याने महाविद्यालयीन विद्यार्थीनीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋतुजा नाईक असे मारहाण करण्यात आलेल्या मुलीचे नाव असून या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. वसईला उतरण्यासाठी चर्चगेट लोकल का पकडली, असा सवाल करत या महिलांनी ऋतुजाशी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि या महिलांनी ऋतुजाला मारहाण करण्यास सुरूवात केली. याप्रकरणी वसई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ऋतुजाने ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी चार महिलांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन हल्ली अनेक वादांचे घर बनत आहे. लोकल ट्रेनमध्ये बसणाच्या जागेच्या वादावरुन, स्टेशनवर उतरण्याच्या विषयावरुन महिला व पुरुषांच्या डब्यात नेहमीच खटके उडत असतात. विरार-चर्चगेट लोकलमध्ये काही मुजोर महिलांच्या मक्तेदारीची घटना आता समोर येत आहे. ‘वसईला उतरण्यासाठी विरार लोकलच का पकडली?’, असा प्रश्न करत आठ वाजून चाळीस मिनिटांच्या एका लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या एका गटाने इंजिनिअरिंग शिकणाऱ्या २० वर्षीय ऋतुजा नाईक या तरुणीला बेदम मारहाण केली आहे. ‘वसईला उतरणाऱ्यांनी बोरीवली, अंधेरी, वांद्र्याच्या लोकलमध्ये चढावं, कारण वसईला उतरणारे प्रवासी नालासोपाऱ्याला चढणाऱ्यांचा रस्ता अडवतात. त्यामुळे त्यांना ट्रेनमध्ये चढता येत नाही’ असा वाद घालत या महिलांनी बाचाबाचीला सुरुवात केली. दरम्यान ऋतुजा वसई स्थानकावर उतरण्यासाठी पुढे सरसावली असता तिला काही महिलांनी मागे खेचत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये तिच्या मनगटाला दुखापत झाली असून ऋतुजाला अस्थमाचा झटकाही आला. लोकलमध्ये महिलांच्या या वाढत्या दादागिरीची गंभीरता लक्षात घेता वसई रेल्वे पोलिस निरीक्षक महेश बागवे यांच्या माहितीनुसार अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.