शासकीय सेवेतील गर्भवती व दुर्धर आजार असलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थितीची सक्ती न करता त्यांना घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) मुभा देण्यात यावी, अशी मागणी महिला व बालविकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या ५० वर्षांहून अधिक वयाच्या तसेच गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना करोना संसर्गाचा धोका संभवतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

करोनाचा संसर्ग होऊन स्वत:स तसेच बाळाला धोका पोहचू नये यासाठी अनेक गर्भवती महिला अधिकारी-कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. तसेच टाळेबंदीच्या कालावधीत वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनेही या गटातील शासकीय महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी, खूपच अत्यावश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करू देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा, तसेच घरातून काम करण्याची त्यांना  मुभा द्यावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.