महिला चित्रपट निर्मात्यांची स्पष्टोक्ती

‘मी टू’ चळवळीत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या व्यक्तींबरोबर काम करणार नाही, असे भारतीय चित्रपट उद्योगातील काही महिला निर्मात्यांनी जाहीर केले आहे.

यात कोंकणा सेन शर्मा, नंदिता दास, मेघना गुलजार, गौरी शिंदे, किरण राव, रीमा कागटी व झोया अख्तर यांच्यासह ११ महिलांचा समावेश आहे. या चित्रपट निर्मात्यांनी मीटू चळवळीला पाठिंबा जाहीर केला असून त्यांनी म्हटले आहे, की महिला व चित्रपट निर्मात्या म्हणून आम्ही मीटू इंडिया चळवळीला पाठिंबा देत आहोत. ज्या महिलांचा लैंगिक छळ झाला त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभ्या आहोत. त्या महिलांनी जे धैर्य दाखवले त्याला आमचा सलाम!  यामुळे एका चांगल्या बदलास सुरुवात झाली आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित व समानतेचे वातावरण मिळाले पाहिजे. ज्या लोकांवर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत त्यांच्या समवेत आम्ही आता काम करणार नाही. इतरांनाही आम्ही तसेच करण्याचे आवाहन करीत आहोत. या निवेदनावर अलंकृता श्रीवास्तव, नित्या मेहरा, रुची नारायण व शोनाली बोस यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. मीटू चळवळीच्या पाश्र्वभूमीवर चित्रपट उद्योगातील अनेक बडय़ा अभिनेते, दिग्दर्शकांवर आरोप झाले असून त्यांनी लैंगिक गैरवर्तन व छळवणूक केल्याचे काही महिला अभिनेत्रींनी स्पष्टपणे म्हटले आहे.

नाना पाटेकर, रजत कपूर, सुभाष कपूर, आलोक नाथ, सुभाष घई, विकास बहल, कैलाश  खेर, साजिद खान, मुकेश छाब्रा, गायक रघु दीक्षित, वैरामुथु यांची नावे यात आली आहेत.