26 February 2021

News Flash

महिलांना उद्योगक्षेत्रात सर्वाधिक संधी!

गेल्या काही वर्षांमध्ये महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविलेला आहे. उद्योग क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आगामी काळात महिलांना या क्षेत्रात मोठय़ा संधी निर्माण होत असून

| June 25, 2014 03:56 am

गेल्या काही वर्षांमध्ये महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविलेला आहे. उद्योग क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आगामी काळात महिलांना या क्षेत्रात मोठय़ा संधी निर्माण होत असून महिलांनी या संधीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे आवाहन महिला उद्योजिकांनी केले.
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाअंतर्गत ‘महाराष्ट्र : उद्योगाचे आव्हान’ या विषयावर झालेल्या दोन दिवसीय परिसंवादात ‘आम्ही उद्योजिका’ या सत्रात हे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष मीनल मोहाडीकर, ‘इंडोको रेमिडीज’च्या व्यवस्थापकीय संचालक आदिती कारे-पाणंदीकर आणि ‘कमानी टय़ूब्ज लि.’च्या अध्यक्षा कल्पना सरोज या उद्योजिकांनी त्यांना आलेल्या समस्या, त्यावर मात करीत त्यांनी या क्षेत्रात संपादन केलेले यश याचा लेखाजोखा मांडताना महिलांनी या क्षेत्रात येऊन आव्हाने पेलण्यासाठी काय करावे यासाठी यासाठी मार्गदर्शन केले.
वर्षभरापूर्वी कंपनी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार प्रत्येक कंपनीच्या संचालक मंडळामध्ये किमान एका महिलेचा समावेश अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपापल्या क्षेत्रात यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या महिलांना त्याचा फायदा करून     घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर उद्योग क्षेत्रात उच्चपदावरील महिलांची हाताच्या बोटावर मोजण्याएवढी असलेली ही संख्या या महिलापुरस्कृत धोरणांमुळे येत्या चार-पाच वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढेल, असा  आशावाद या वेळी तिन्ही यशस्वी उद्योजिकांनी व्यक्त केला.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा
भारतीय औषधनिर्मिती क्षेत्रात आपला उमटविणाऱ्या कारे यांनी या क्षेत्रातील महिलांसाठी असलेल्या संधीबाबतही माहिती दिली. काम आणि घराची जबाबदारी अशी तारेवरची कसरत ही खरेतर आजच्या विविध क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे. एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत शिरणे ही एका जबाबदारीच्या ताणातून स्वत:ला शांत करण्यासारखे आहे. त्याचमुळे घर आणि काम याबाबतच्या जबाबदाऱ्यांकडे नकारात्मकदृष्टय़ा न पाहता त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचा सल्ला कारे यांनी यावेळी दिला. यशस्वी महिलांच्या माध्यमातूनच महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यास मदत होईल आणि हे सत्कार्य ‘लोकसत्ता’ने करावे, असेही कारे म्हणाल्या.
विविध योजना उपलब्ध
महिला उद्योजकांसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनांपर्यंत महिलांनी पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी विविध संस्था मदत करीत असतात, अशी माहिती मोहाडीकर यांनी दिली. परंतु उद्योजिका म्हणून स्वत:चे करिअर घडवू पाहणाऱ्या महिलांनीही या योजनांबाबत स्वत: माहिती करून घेणे तेवढेच गरजेचे असल्याचे मोहाडीकर यांनी सांगितले. काही योजनांअंतर्गत महिलांना आपले उत्पादन परदेशात विकण्याची संधी ही मिळू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली. तर एका गरीब शेतकऱ्याची मुलगी ते बिल्डर आणि तेथून पुढे ‘कमानी टय़ूब्ज लि.’च्या अध्यक्षपदापर्यंतचा खडतर प्रवास कल्पना सरोज यांनी मांडला. संधी उपलब्ध आहेत फक्त आपण तिथपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 3:56 am

Web Title: women has highest opportunity in the industry sector
Next Stories
1 रेल्वे दरवाढीला बायपास!
2 मेट्रोही माहागणार
3 रेल्वेभाडेवाढीविरोधात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे एक्स्प्रेसरोको
Just Now!
X