सोनेखरेदीचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी गुरुवारी नागपाडा येथील एका सराफाच्या दुकानातून १७ लाख रुपयांचे दागिने लुटून पोबारा केला. दोघींनीही बुरखा परिधान केल्याने दोघींचीही ओळख पटू शकलेली नाही. जयंतीलाल जैन (५५) यांचे नागपाडा येथील डी. के. हाऊस येथे ‘एस. डी. ज्वेलर्स’ हे दागिन्यांचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास दोन बुरखाधारी महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात शिरल्या. बराच वेळ दोघींनी विविध डिझाईनचे दागिने पाहण्यात घालविला. दागिने दाखविणाऱ्या दुकानातील नोकराला त्यात गुंतवून ठेवत नंतर दोघींनी संधी साधली आणि जवळच असलेल्या वजन काटय़ावरील सोनसाखळीचा बॉक्स घेऊन तेथून पाय काढला. त्या बॉक्समध्ये ६२७ ग्रॅमच्या ६० सोनसाखळी होत्या.
पवई येथे सात वर्षांच्या मुलाची हत्या
पवई येथील साकी विहार रोड परिसरातील एका बांधकाम करण्यात येणाऱ्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सात वर्षांच्या मुलाचा गळफास लावलेला मृतदेह आढलून आला. त्याची हत्या करण्यात आली असून हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु या मुलाचे वडील याच इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहेत व त्यांनी मुलगा हरविल्याची तक्रार नोंदवली होती.
श्यामसुंदर राजिबद असे या मुलाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता. शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या वडिलांनी अखेर तो हरविल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रात्री उशिरा पारिजात टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर श्यामसुंदरचा गळफास लावलेला मृतदेह आढळून आला. या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शत्रुत्त्वातून ही हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.