News Flash

राजकारणातील सहभाग वाढला, तरी स्त्री असुरक्षितच

वर्षभरात अत्याचाराच्या ३२ हजार घटनांची नोंद

वर्षभरात अत्याचाराच्या ३२ हजार घटनांची नोंद

एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा सहभाग वाढल्याचे सामाजिक परिवर्तनाचे आशादायी चित्र दिसत असले, तरी राज्यात स्त्री सुरक्षित नाही, असे भयावह वास्तवही पुढे आले आहे. गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचारांच्या ३२ हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. त्यात कौटुंबिक िहसा, बलात्कार, अपहरण, विनयभंग, अशा गंभीर गुन्ह्य़ांचा समावेश आहे. राजकारणात स्त्री-पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, अजूनही मुलगा व मुलगी यांच्या जन्मदरातील विषमता चिंताजनक आहे. राज्याच्या २०१६-१७ च्या आर्थिक पाहणी अहवालातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवण्यात आले. राजकीय क्षेत्रात का असेना, राज्य सरकारने स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे व क्रांतिकारक पाऊल ठरले व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सहभाग वाढला. राज्यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांची संख्या २९ हजार १०२ इतकी आहे. त्यात २ लाख ४३ हजार ३८७ एकूण सदस्य संख्या आहे. त्यातील महिला सदस्यांची संख्या एक लाख २१ हजार ८४८ आहे. ही आकडेवारी डिसेंबपर्यंतची आहे. त्यात पुरुषांपेक्षा महिला सदस्यांची संख्या किंचितशी जास्तच आहे. सामाजिक बदलाच्या दृष्टीने हे चित्र आशादायक वाटते. परंतु दुसऱ्या बाजूला स्त्रियांवरील अत्याचारातही वर्षांगणिक वाढ होत असल्याचे चिंताजनक वास्तवही आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

निरक्षर स्त्रियांची संख्या पावणेदोन कोटी!

राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावल्याचे दाखविले जाते. मात्र अजूनही शहरी व ग्रामीण भागातील १ कोटी ७८ लाख ३५ हजार महिला निरीक्षर असल्याची माहिती या अहवलीत देण्यात आली आहे. निरीक्षर पुरुषांची संख्या १ कोटी २९ लाख ८५ हजार आहे. उच्च शिक्षणातील स्त्री-पुरुष असमानता, विवाहानंतर महिलांचे मोठय़ा प्रमाणावर होणारे स्थलांतर, स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत, यावरही या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.

  • विनयभंगाच्या घटना : ११ हजार ३८८
  • बलात्काराच्या घटना : चार हजार २०९
  • अपहरणाच्या घटना : चार हजार ७७६
  • पती, नातेवाइकांकडून अत्याचार: सहा हजार ३०२ प्रकरणे
  • हुंडाबळी : २२७
  • लैंगिक अत्याचार : ७९३
  • अनैतिक व्यापार : ३१७

स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना

  • २०१४ : २६ हजार ६९३
  • २०१५ : ३१ हजार १२६
  • २०१६ : ३२ हजार ५४८

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:06 am

Web Title: women in india still feel unsafe
Next Stories
1 व्हिक्टोरियावरील बंदी अयोग्य
2 मुंबई बडी बांका : तसबिरीचा कारखाना
3 खाऊखुशाल : नवलाईची दुनिया!
Just Now!
X