महिलांवरील बलात्कार किंवा अत्याचारांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक असल्याचे सांगत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शायना एनसी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची आज री ओढली. राज्यभरात सरकारने महिलांसाठी विशेष बसगाडय़ा सुरू कराव्यात आणि सुमारे ५० हजार महिला पोलिसांची नियुक्ती करावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
मुक्त विचारसरणीच्या ‘इंडिया’त बलात्कार होतात, भारतात होत नाहीत, अशा आशयाच्या सरसंघचालकांच्या विधानाबाबत शायना यांना पत्रकारांनी प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी त्यास दुजोरा दिला. ते वक्तव्य चुकीच्या पध्दतीने मांडले गेल्याचा दावा त्यांनी केला. बलात्कार किंवा महिला अत्याचारांच्या आकडेवारीवरूनही शहरी भागात अत्याचाराचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, महिलांवरील अत्याचारांची दखल घेण्यासाठी विशेष हेल्पलाइन सुविधा सर्वत्र असावी आणि त्यावरील तक्रारींची तात्काळ दखल घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.