27 September 2020

News Flash

समाजाच्या पुरुषी मानसिकतेला स्त्री चळवळीने उत्तर

women movement against men mentality women movement, men mentality समाजाच्या पुरुषी मानसिकतेला स्त्री चळवळीने उत्तर बंगळुरूच्या घटनेनंतर ‘आय विल गो आऊट!’चा आवाज अधिक बुलंद मीनल गांगुर्डे, मुंबई बंगळुरूमधील नववर्ष स्वागताच्या

 

बंगळुरूच्या घटनेनंतर ‘आय विल गो आऊट!’चा आवाज अधिक बुलंद

बंगळुरूमधील नववर्ष स्वागताच्या पार्टीनंतर घरी परतणाऱ्या तरुणीवर ओढवलेला अतिप्रसंग आणि त्यानंतर या मुलीच्याच चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणारी समाजाची पुरुषी मानसिकता यांना चोख उत्तर देण्यासाठी देशभर एक नवी चळवळ निर्माण झाली आहे. महिलांच्या मुक्त भटकंतीचा आग्रह धरणाऱ्या ‘आय विल गो आऊट!’ या चळवळीच्या माध्यमातून देशात नवीन आंदोलन उभे राहत असून येत्या ८ मार्च रोजी याबाबतचा अहवाल केंद्र व राज्य सरकारांना सादर करण्यात येणार आहे.

या किंवा या प्रकारच्या घटनांनंतर अनेकदा मुलींच्या रात्री-अपरात्री फिरण्याबाबत, त्यांच्या पेहरावाबाबत प्रश्न उपस्थित करून मूळ प्रश्नाला बगल दिली जाते. समाजाच्या या पुरुषप्रधानतेला उत्तर म्हणून देशभरात ‘आय विल गो आऊट’ ही चळवळ मूळ धरू लागली. परंतु आता समाजमाध्यमांपुरती मर्यादित असलेली ही चळवळ आंदोलनात रूपांतरित होऊ लागली आहे. नुकतेच म्हणजे २१ जानेवारीला दिल्ली, बंगळुरू, मुंबईसह ३० शहरांमध्ये एकाच वेळी कानाकोपऱ्यातील मुलींनी आंदोलन केले. दादरच्या कोतवाल उद्यानात झालेल्या आंदोलनात महाविद्यालयीन मुलींबरोबरच नोकरदार महिलाही सहभागी झाल्या होत्या. या वेळी मुलींकडून त्यांचे अनुभव लिहून घेण्यात आले. आता ८ मार्चला महिना दिनानिमित्ताने महिलांची मुक्तपणे फिरण्याबाबतची मते जाणून घेऊन त्याचा एक अहवालच केंद्रासह राज्यभरातील विविध सरकारांना सादर करण्याची मोहीम या आंदोलनाने हाती घेतली आहे.

‘महिला स्वत:च्या घरातही सुरक्षित नाहीत. त्यामुळे ही चळवळ फक्त या एका घटनेपुरती न राहता सरकारी पातळीवर याची दखल घेण्याची गरज आहे. या चळवळीला आसाम, मध्य प्रदेश या राज्यांतील ग्रामीण भागातील महिलांनीही पाठिंबा दिला आहे,’ असे आय ‘विल गो आऊट’ चळवळीच्या मुंबई समन्वयक श्रुती कुट्टी यांनी सांगितले. तर ‘रात्रीच नव्हे तर दिवसाही मुलींना पुरुषांच्या अश्लील नजरेचा सामना करावा लागतो. अशा पुरुषांच्या भीतीने महिलांना एकटे बाहेर फिरणे शक्य होत नाही. रात्री फिरणाऱ्या महिलेकडे वाईट नजरेनेच पाहिले जाते. ही नजर बदलण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा ‘मजलिस’च्या अन्ड्रे डिमेलो यांनी या मोहीमेच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त केली.

पुरुषांनाही त्याचनजरा झेलाव्या लागल्या

मुंबईतील नेहा सिंग या महिलेने ‘वॉक लाइक अ वुमन’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या माहितीपटात रात्री भटकंती करणाऱ्या मुलींसोबत पुरुषांनीही भाग घेतला होता. यासाठी मुलींना नेमक्या कुठल्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे अनुभवण्याकरिता ध्रुव लोहोमी, सचित पुराणिक आणि अक्षत निगम या पुरुषांनी मुलींचे कपडे घालून भटकंती केली. त्यांनाही महिलांच्या कपडय़ात वावरताना इतर पुरुषांकडून नको नको ती शेरेबाजी ऐकावी लागली. ‘सुरुवातीला मुलीचे कपडे घालून फिरणे अवघड वाटत होते. तसेच यापूर्वी आमच्याकडे इतके लक्ष कुणी दिले नव्हते,’ असे आपले अनुभव ध्रुव लोहोमी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘पुरुषांच्या नजरेतूनच महिलांना होणाऱ्या मानसिक त्रासाविषयी आतापर्यंत फक्त ऐकून होतो. मात्र अशा नजरा झेलणे हे खूप भयावह असल्याचे यानंतर कळून चुकले,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2017 12:58 am

Web Title: women movement against men mentality
Next Stories
1 पत्र रद्द, पण देवतांची प्रतिमाबंदी कायमच!
2 खारफुटींच्या संरक्षणासाठीच्या समितीची पुनस्र्थापना करा
3 ‘ह्याला जबाबदार कोण?’; युती तुटताच भाजपचे शिवसेनेविरोधात ‘पोस्टरवॉर’
Just Now!
X