स्मार्टफोन, इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले असून त्याचा वापर वाढत असताना काही जण त्याचा गैरवापरही करत आहेत. बऱ्याचदा महिला या त्यांचे लक्ष्य असते. यामुळे सर्वांनाच विशेषत: युवती, महिलांना ‘डिजीटली  सक्षम’ करणे काळाची गरज झाली आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. तसेच महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्यालय प्रत्येक विभागस्तरावर लवकरच कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि ‘रिस्पाँन्सिबल नेटिझम‘ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सखी या उपक्रमाचा शुभारंभ ठाकूर यांनी वेबिनार माध्यमातून केला.

सध्या वेगळ्याच जगाला आपण सामोरे जात आहोत, सगळे व्यवहार बंद असताना मोबाईल हेच संवादाचे, संपर्काचे माध्यम झाले आहे. मात्र, ऑनलाईन गुन्हेही वाढत असल्याने सुरक्षित वापरासाठी समाजातील प्रत्येकाला जागरुक करणे गरजेचे असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले. ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रमातून हा उद्देश साध्य होईल.

टाळेबंदीनंतर आयोगाने जवळपास ४०० तक्रारींवर कार्यवाही करत महिलांना न्याय, दिलासा मिळवून दिला आहे. मात्र आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने कामकाजाचे विकेंद्रीकरण व्हावे, महिलांना सुलभ संपर्क करता यावा यासाठी विभागस्तरावर महिला आयोगाचे कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रमांतर्गत मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा १० शहरातील १६ ते २५ वयोगटातील ५००० महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे  प्रशिक्षण देत ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
  • इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, सायबर गुन्हे आणि कायदा, मानसिक परिणाम, तांत्रिक बाबी आदीबाबत सायबर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.