मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रण गुन्हे शाखेच्या हाती

वॉर्डन मंजुळा शेटय़ेची हत्या भायखळा कारागृहातील महिला पोलिसांनीच केल्याचे भक्कम पुरावे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. हत्येमागील हेतू व मंजुळावरील लैंगिक अत्याचाराबाबत गुन्हे शाखा आरोपी महिलांकडे कसून चौकशी करत आहेत. २ अंडी, ५ पावांवरून मंजुळाची हत्या घडलेली नाही. त्यामागे निश्चित वेगळा हेतू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेने शुक्रवारी न्यायालयाला दिली. लोकसत्ताला मिळालेल्या माहितीनुसार विविध दृष्टीकोनातून तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने आरोपी महिलांच्या मालमत्तेचीही चौकशी सुरू केली आहे.

मंजुळाच्या हत्येनंतर महिला कैद्यांनी केलेल्या तोडफोड, जाळपोळीत कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र नुकसान होईपर्यंतचे चित्रण साठवून ठेवणारे यंत्र एनव्हीआर गुन्हे शाखेने हस्तगत केले. ते कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेत धाडले. तेथील तज्ञांनी एनव्हीआरमधून चित्रण मिळवले व ते गुन्हे शाखेच्या हवाली केले. या चित्रणात जेलर मनिषा पोखरकरसह एकूण सहा आरोपी महिला पोलीस मंजुळाला मारहाण करताना दिसतात. हे चित्रण पाहिल्यानंतर त्यात या सहाजणींव्यतिरिक्त अन्य अधिकारी व कर्मचारीही या कटात, मारहाणीत सहभागी असावे, असा संशय गुन्हे शाखेकडून व्यक्त होत आहे.

शुक्रवारी तपास अधिकारी प्रभा राऊळ यांनी दोन अंडी व पाच पावांवरून घडलेल्या वादातून मंजुळाची हत्या होणे शक्य नाही. तो दावा गुन्हे शाखेला पचलेला नाही. निश्चित या मागे वेगळा हेतू आहे आणि तो शोधण्यासाठी तपास सुरू आहे, अशी माहिती न्यायालयाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार कारागृहातील भ्रष्टाचाराविरोधात मंजुळाने आवाज उठवल्याने तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खदखद होती. त्यातून हत्या घडली का हे तपासण्यासाठी चौकशीसोबत आरोपींच्या निवासस्थान, मूळ गावी पथके धाडून गुन्हे शाखेने मालमत्तेचा अंदाज घेतला. याकारवाईत गुन्हे शाखेचे पथक जेलर पोखरकरच्या मंचर येथील घरी धडकले हेाते.

गुन्हे शाखेने सर्व आरोपी महिलांचे मोबाईल फोन जप्त करून त्याआधारे तांत्रिक तपास सुरू केला आहे. मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, लघुसंदेश, समाजमाध्यमांवरून साधलेला संवाद याबाबी गुन्हे शाखेने तपासाखाली घेतल्या आहेत. तसेच लैंगिक अत्याचाराचा आरोपातील तत्थ्यता पडताळून पाहाण्यासाठी मंजुळाचे कपडे, अंतरवस्त्रे ताब्यात घेत न्यायवैद्यकीय प्रयोग शाळेत धाडली आहेत. गेल्या आठवडय़ापासून गुन्हे शाखा आरोपी महिलांकडील लाठय़ा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. मंजुळावरील लैंगिक अत्याचारात लाठीचा वापर झाल्याची तक्रार आहे. मात्र लाठय़ा अद्याप हस्तगत झालेल्या नाहीत. कारागृहात घडलेल्या जाळपोळीत या लाठय़ा आरोपी महिलांनी नष्ट केल्या असाव्यात असा संशय आहे. त्यासोबतच सीसीटीव्हींचे नुकसानही त्यांनीच केल्याचा दाट संशय गुन्हे शाखेला आहे.