काळी-पिवळी रंगसंगती महिला रिक्षाचालकांसाठी बदलणार
नेहमीच्या काळ्या-पिवळ्या रंगसंगतीला सुट्टी देत आता परिवहन विभागाने महिला रिक्षाचालकांसाठी आरक्षित असलेल्या रिक्षांसाठी वेगळी रंगसंगती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे महिला चालकांसाठीच्या रिक्षा फक्त महिला चालकांकडूनच चालवल्या जातील, अशी खात्रीही खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.
अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी राज्यातील रद्द झालेल्या तब्बल ३५,६२८ परवान्यांची ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी रावते यांनी महिला चालकांसाठी राखीव असलेले सर्व परवाने केवळ महिलांनाच दिले जातील, असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे या रिक्षा महिलाच चालवत आहेत, यावरही लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या एकूण परवान्यांमधील पाच टक्के परवाने परिवहन विभागाने महिला रिक्षाचालकांसाठी राखीव ठेवले होते. मुंबई महानगर प्रदेशातील ३१४ महिला चालकांनी या परवान्यांसाठी अर्ज केले होते. एवढी कमी संख्या आल्यानंतर अजूनही १४६७ परवाने महिलांसाठी राखीव आहेत.
हे परवाने यापुढेही महिलांसाठीच राखीव ठेवले जाणार असल्याचे रावते यांनी सांगितले. या लॉटरीत मुंबई महानगर क्षेत्रात नूतन खळे, तृप्ती पोफळे, रिना सॅम्युअल आणि वंदना घाडी या चार महिलांचा पहिल्या चार क्रमांकांत सहभाग आहे. या परवान्यांशिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील महिन्यात राज्यभरात आणखी एक लाख नवे परवाने लॉटरी पद्धतीनेच काढण्याची घोषणाही रावते यांनी केली.