जागतिक महिला दिनानिमित्त राज्य सागरी मंडळाचा निर्णय

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सागरी मंडळाने आता जलप्रवासात महिलांना तीन आसने राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असून बोटींमध्ये आता महिलांसाठी सलग तीन आसने आरक्षित राहणार आहेत. हा निर्णय लागू करण्याचे आदेश देण्यात आले असून या निर्णयाने मुंबई ते कोकण या भागांमध्ये नियमित जलप्रवास करणाऱ्या महिलांना दिलासा मिळेल.

महाराष्ट्राला जवळपास ७२० किलोमीटरचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला असून या किनाऱ्यांवरील छोटय़ा व मोठय़ा बंदरांवरून बोटींमार्फत जलवाहतूक सुरू आहे. या किनारपट्टीवरील लहान बंदरांचे नियोजन हे महाराष्ट्र सागरी मंडळाकडे असून या लहान बंदरांच्या हद्दीतून जलप्रवासी वाहतूक संस्थांमार्फत दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख प्रवासी जलमार्गाने प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये महिलांची प्रमाणही लक्षणीय आहे. या महिला प्रवाशांची सोय लक्षात घेता येत्या महिला दिनापासून बोटींमध्ये ‘बेस्ट’ बसप्रमाणे महिलांसाठी कमीत कमी तीन सलग आसने आरक्षित ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे घेण्यात आला आहे.

तसेच या आसनांवर ठळकपणे महिलांसाठी आरक्षित असे लिहिण्यास बोट वाहतूक संस्थांना सूचित केले आहे. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत असलेल्या लहान बंदरांवर सध्या १७ विविध संस्थांमार्फत जलवाहतूक करण्यात येते. या संस्थांना हा निर्णय कळवण्यात आला असून येत्या ८ मार्चला महिला विशेष बोट आणि महिला पर्यटन फेरी यांसारखे नि:शुल्क उपक्रम राबवावेत असेही सुचविण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी दिली.

महिला दिनी मोफत सफर

महिला दिनी गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटापर्यंत मोफत समुद्र सागरी सफरीचे आयोजन महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे करण्यात आले आहे. या सहलीकरिता गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ९ वाजता आणि दुपारी १२ वाजता खास महिलांसाठी आरक्षित बोटसेवा पुरविण्यात आली आहे. ही फेरी नि:शुल्क असून एलिफंटा जेट्टीवर उतरल्यानंतर मिनी ट्रेन सफर आणि घारापुरी लेण्यांचे दर्शन या सेवाही महिलांना नि:शुल्क पुरविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाचे बंदर अधीक्षक प्रदीप बढीये यांनी सांगितले.