वाहन, सोनसाखळी चोरी, दंगल आणि चोरींच्या घटनांमध्ये घट
प्रजा फऊंडेशनचा अहवाल प्रसिद्ध
मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही महिलांवरील अत्याचारांचा गुन्ह्यांचा आलेख मात्र वाढला असल्याची माहिती ‘प्रजा फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. पण त्याच वेळी सोनसाखळी चोरी, दंगल, वाहन चोरी आणि अन्य चोरींच्या घटनांच्या प्रमाणात घट झाली असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात मागील वर्षांत बलात्काराच्या ४३२ घटना घडल्या होत्या तर २०१४-१५ मध्ये ६४३ घटना घडल्या आहेत. बलात्कारांचे प्रमाण ४९ टक्के वाढले असून विनयभंगाच्या घटनेतही ३९ टक्के वाढ झाली आहे. तर घरफोडीचे प्रमाण २ टक्के तर खून करण्याचे प्रमाण ७ टक्क्य़ांनी वाढले आहेत.
मुंबई व उपनगरात महिलांकडून तक्रारी नोंदवण्याचे प्रमाण आणि गुन्ह्य़ातील अटक कलेले आरोपी न्यायालयात निर्दोष सुटण्याचे प्रमाण वाढल्यामुळे महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी वाढली असल्याचे ‘प्रजा फाऊंडेशन’च्या मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.
सोन्याची साखळी चोरण्याच्या घटना ४४ टक्के, वाहन चोरीच्या घटना १३ टक्के आणि दंगलीच्या घटनांची आकडेवारी ९ टक्क्य़ांनी घसरली आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या ११ टक्क्य़ांनी कमी असून तपास अधिकाऱ्यांचे प्रमाण २५ टक्क्य़ांनी कमी असल्याचेही ‘प्रजा’ने अहवालात म्हटले आहे.
‘प्रजा फाऊंडेशन’ने केलेल्या सर्वेक्षानुसार ‘दक्षिण मध्य मुंबई’ महिला व बालकांसाठी असुरक्षित असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. चेंबूर, शीव, कोळीवाडा, माहीम आदी विभागांचा यात समावेश आहे.
या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ४० टक्के महिला व बालकांनी दक्षिण मध्य मुंबई असुरक्षित असल्याचे मत नोंदवले गेले असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
नियंत्रण कक्षात ५१ टक्के मनुष्यबळ कमी
शहरात मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर वर्षभरात सुमारे लाखोंच्या संख्येत मदतीसाठीचे दूरध्वनी येतात. मात्र मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ५१ टक्के मनुष्यबळाची कमतरता असल्याचे ‘प्रजा’च्या वत्तीने सांगण्यात आले. त्यामुळे अनेक लोकांना वेळेवर मदत मिळाली नसण्याची शक्यता आहे.

निर्दोष मुक्तता प्रमाण ७७ टक्क्य़ांवर
जानेवारी २००८ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासानुसार महिलांच्या अत्याचारांवरील गुन्ह्य़ांमध्ये आरोपी न्यायालयात निर्दोष सुटण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे. त्यामुळे महिलांच्या अत्याचाराच्या गुन्ह्य़ांची आकडेवार वाढली असल्याचेही सांगण्यात आले.

केवळ ४ आमदार जागरुक
२०१४-१५ या कालावधीत अत्याचाराच्या घटनांबाबत मुंबईच्या अवघ्या चार आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहा प्रश्न उपस्थित केले होते. तर भारती लवेकर, रमेश लटके, सुनील राऊत, सेल्व्हन तमिळ आदी चार आमदारांनी एकाही गुन्ह्य़ाविषयी एकही प्रश्न न विचारण्याची तसदी घेतली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

पोलिसांची संख्या अवघी १.३५ टक्क्यांनी कमी
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात मुंबई पोलिसांच्या संख्येत आवश्यकतेपेक्षा ११ टक्क्य़ांनी कमतरता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र केवळ ५४१ पदे म्हणजेच १.३५ टक्क्य़ांची कमतरता आहे.
– धनंजय कुलकर्णी, मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि उपायुक्त