लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण ५० टक्के असेल तर कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्येही त्यांचे प्रमाण ५० टक्के हवे, अशी भूमिका डेलॉइट या आंतरराष्ट्रीय वित्तीय सल्लागार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत रंजन यांनी मांडली. डेलॉइट कंपनीच्या ‘वर्ल्ड क्लास’ या उपक्रमातंर्गत शिष्यवृत्ती मिळालेल्या भारतातील २५० तरुणींनी रंजन यांच्याशी शुक्रवारी अमेरिकेतील पोर्टलॅण्ड शहरातून वेबसंवाद साधला.
तुमच्या कंपनीत महिलांना प्रोत्साहन मिळते का, तुमचे छंद कोणते, तुम्ही आत्मविश्वास कसा वाढवला, सुरुवातीपासूनच तुमचे हेच उद्दीष्ट होते का असे अनेक थेट प्रश्न भारताच्या कानाकोपऱ्यातील तरुणींकडून या वेबसंवादात विचारले गेले. जगातील आघाडीच्या वित्तीय सल्लागार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत रंजन यांनी त्यांना मोकळेपणाने उत्तरे दिली.
डेलॉइटच्या पाठिंब्याने उदयन केअर संस्थेच्या माध्यमातून ‘उदयन शालिनी’ ही पाच वर्षांची शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीधारक तरुणींचे सक्षमीकरण, व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यांना रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने यामध्ये उपक्रम घेतले जातात. २०१७ पासून ही शिष्यवृत्ती डेलॉइटच्या पाठिंब्याने दिली जाते.
अमेरिकत शिकायला गेल्यावर तेथील इतर बाबींकडे न आकर्षित होता यश कसे मिळवले या ठाणे येथील शक्ती कोनारने विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘शिष्यवृत्तीवर परदेशात आलो असल्याने काहीतरी चांगले करून दाखविण्याची अपेक्षा होती, ती माझी जबाबदारी होती. अडचणी होत्या, पण मी शिकण्यामध्येच आनंद शोधला.’
‘आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण कोण आहोत याची स्वत:ला जाणीव व्हायला हवी आणि विषयाची पूर्ण तयारी हवी,’ असे रंजन यांनी ठाण्यातील हर्षदा गुरव या बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रश्नावर सांगितले. छंद कसे सांभाळता या ठाण्यातील स्नेहा शेंबाडेच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘सध्याच्या धावपळीत मोकळा वेळच कमी मिळतो, पण तरीही वाचन, धावणे आणि क्रिकेट पाहणे या गोष्टी आजही आवर्जून करतो.
वरिष्ठ स्तरावर २६ टक्के स्त्रिया
‘डेलॉइटम’ध्ये स्त्री-पुरुष भेदभाव न करता समान संधी दिली जाते. गुणवत्ता आणि क्षमतेवर कर्मचारी नेमणूक केली जाते. कर्मचाऱ्यांपैकी ५२ ते ५३ टक्के पुरुष असून उर्वरित महिला आहेत. ‘डेलॉइट’च्या आंतरराष्ट्रीय भागीदारीत वरिष्ठ स्तरावर २६ टक्के महिला असून त्यात समानता आणली जाईल, असे रंजन यांनी नमूद केले. गुरगावच्या मेघा तन्वर हिने डेलॉइटमधील महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर रंजन यांनी ही माहिती दिली.
यशाची पंचसूत्री : वेबसंवादादरम्यान त्यांनी हरयाणातील रोहतक ते जागतिक स्तरावरील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा आपला प्रवासदेखील उलगडला. यश मिळवण्यासाठी कोणताही जवळचा, सोपा मार्ग न घेता कठोर मेहनत करा. कामात आनंद शोधा, स्वत:ला ओळखा, मेहनतीत आयुष्यभर सातत्य राखा आणि चुकांना घाबरू नका अशी पंचसूत्री त्यांनी मांडली. रोहतकमधून बाहेर पडलो. व्यवसायात करिअर करायचे इतकेच उद्दिष्ट होते. अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून डेलॉइटमध्ये आल्यावर माझ्या कौशल्याला वाव मिळाला. येथेच भरपूर मेहनत केली आणि यश मिळाले, असेही त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 28, 2020 12:19 am