सहा महिन्यांपर्यंतचे मूल दत्तक घेणाऱ्या पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्याची दत्तक रजा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र १० वर्षांपर्यंतचे मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनाही दत्तक रजा द्यावी, अशी मागणी नगरेसविकांकडून करण्यात येत आहे.
मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना पूर्वी ९० दिवस दत्तक रजा देण्यात येत होती. महिला कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी दत्तक रजा तीन महिन्यांवरुन सहा महिने करण्याबाबतच्या प्रस्तावास विधी समितीने २०११ मध्ये हिरवा कंदील दाखविला होता. परंतु मूल सहा महिन्यांपेक्षा मोठे नसावे अशी अट त्यावेळी घालण्यात आली होती. ही अट शिथिल करावी असा आग्रह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेविकांनी धरला आहे.
मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस सुमारे एक वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे एक वर्षांचे मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची रजा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी सभागृहात केली. तसेच १० वर्षांपर्यंतच्या मूलाला दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनाही या रजेचा लाभ मिळायला हवा, असा आग्रह माजी महापौर शुभा राऊळ यांनी धरला. वयाची अट शिथिल करण्याबाबतच्या ठरावाच्या सूचनेला पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली असून  अभिप्रायासाठी तो आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.