तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवर सुरू असलेली गोंधळाची परंपरा बुधवारीही कायम राहिली. हार्बर रेल्वे मार्गावर टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने दुपारी तब्बल २० मिनिटे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या काळात नऊ उपनगरी गाडय़ा उशिराने धावत होत्या तर दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या. टिटवाळा येथे रेल्वे रुळालगत जेसीबी यंत्राने सिग्नलची केबल उखडली गेल्याने दुपारी १२ ते ३ या वेळेत वाहतूक विस्कळीत झाली होती. याचा फटका सुमारे साठ गाडय़ांना बसला आणि वाहतूक कोलडमली. डोंबिवलीत रेल्वेच्या गोंधळपत्रकाने संतापलेल्या महिला प्रवाशांनी रेल्वे रोको केला. रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजत असतानाच दुरुस्तीसाठी वाशी खाडी पुलावरील एक मार्गिका बंद झाल्याने आणि अवजड वाहनांना या पुलावर बंदी आल्याने ठाणे-बेलापूर पट्टय़ात रस्ता वाहतुकीचेही तीनतेरा वाजले..

स्त्रीशक्तीचा ‘रेल्वे रोको’
मध्य रेल्वेच्या गोंधळपत्रकाबरोबरच उद्घोषणांबाबतच्या बेपर्वाईने आणि रेल्वे प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे मंगळवारी डोंबिवलीत महिला प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्या थेट रेल्वे रुळावर उतरून घोषणा देऊ लागल्या. या प्रवाशांना शांत करताना रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ उडाली.
डोंबिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता प्रवाशांची गर्दी उसळली होती. इंडिकेटरवर मुंबईकडे जाणारी १०.३४ ची गाडी लागली होती. मात्र २० मिनिटांहून अधिक काळ ताटकळूनही गाडीचा पत्ता नाही आणि विलंबाबत कोणतीही उद्घोषणा नाही, धीम्या मार्गावरून मात्र गाडय़ा वेळेत धावत आहेत, या प्रकाराने प्रवासी महिला संतप्त झाल्या. १०.३४ची गाडी लागूनही १०.५१ची गाडी प्रथम आल्यानंतर या महिलांनी ही गाडी रोखून घोषणा सुरू केल्याने गोंधळ उडाला.
रूळ तुटला, पेंटोग्राफ जळाला, डबे घसरले अशा अनेक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचे प्रवासी ‘अच्छे दिन’ भोगत आहेत. दररोजच्या या त्रासामुळे प्रवाशांना आठवडय़ातून किमान दोन ते तीन वेळा कार्यालयात उशिरा आल्याचे शेरे सोसावे लागतात. संध्याकाळी घरी परततानाही हीच परिस्थिती. त्यात १०.३४ ची ही गाडी गेल्या अनेक दिवसांपासून उशिराने धावत असून त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाने आश्वासक उत्तर दिले नव्हते. त्यामुळेच संतापाचा कडेलोट झाला.
गाडय़ा वेळेत का धावत नाहीत याची कारणे द्या, मगच मार्गातून बाजूला होऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या विनवण्यांना जुमानले नाही. अखेर यापुढे असे होणार नाही, असे आश्वासन मिळाल्यानंतर महिला रेल्वे रुळांवरून बाजूला झाल्या.

मध्य रेल्वेचे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले रडगाणे, त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी गाडय़ा वेळेवर सोडण्याची कार्यवाही केली नाही तर शिवसेनेतर्फे आंदोलन करू
डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार