शौचालयासाठी मंगळसूत्र गहाण टाकणाऱ्या संगीता नारायण आव्हाडे, विवाहात दागदागिन्यांचा त्याग करणाऱ्या चैताली राठोड आणि घरची गरिबी असतानाही कर्ज घेणाऱ्या सुवर्णा लोखंडे यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला असून हागणदारी मुक्ती आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या या तिघींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सत्कार केला. कार्यशाळा, प्रबोधन व लोकसहभागातून स्वच्छतेचा राज्यात जागर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शहरे हागणदारी मुक्त केल्याबद्दल शहरांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा प्रातिनिधिक  सत्कार सह्य़ाद्री अतिथीगृहात करण्यात आला. वाशीम जिल्ह्य़ातील संगीता नारायण आव्हाडे यांनी स्वत:चे मंगळसूत्र गहाण टाकून शौचालय बांधले, यवतमाळ जिल्ह्य़ातील चैताली राठोड यांनी लग्नात दागदागिन्यांऐवजी वडिलांकडून प्री फॅब्रिकेटेड शौचालये घेतले, तर नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर येथील सुवर्णा लोखंडे यांनी महिला बचत गटाकडून कर्ज घेऊन शौचालय बांधले. या तिघींनीही समाजापुढे आदर्श ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

पालिकांचा गौरव
यावेळी दापोली, वेंगुर्ले, पन्हाळा, मलकापूर (कोल्हापूर), महाबळेश्वर, भगूर, मलकापूर (सातारा), वाई, पाचगणी, रोहा, खेड, चिपळूण, गुहागर, माथेरान, मोवाड, महाड, करमाळा, कुर्डूवाडी या नगरपालिकांसह मुंबई महापालिकेचे बी आणि सी वॉर्ड हागणदारीमुक्त घोषित झाल्याबद्दल महापौर स्नेहल आंबेकर, आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.