स्वाती कुलकर्णी यांचा व्हिवा लाउंजमध्ये ‘भावनिक गुंतवणूक’ मंत्र
कौटुंबिक जबाबदारी म्हणून करिअरपेक्षा घराला प्राधान्य देणाऱ्या स्त्रीला प्रसंगी समाजाकडून आरक्षणाची नव्हे, तर कु टुंबातून आदराचे स्थान मिळावे, असा ‘भावनिक गुंतवणूक मंत्र’ ‘यूटीआय’च्या उपाध्यक्षा व निधी व्यवस्थापक स्वाती कुलकर्णी यांनी मंगळवारी दिला. केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावरून त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या ३९ व्या पर्वात कुलकर्णी यांनी गुंतवणूक या किचकट विषयाचे सुलभ विवेचन करत शेअर बाजार, म्युच्युअल फंड आदींचा वेध घेतला. वित्त क्षेत्रातील एक विधी व्यवस्थापक म्हणून आपल्या करिअरचा प्रवास उलगडताना खेळाकडून अभ्यासाकडे असा जीवनपट विस्तृत केला. घरातली जबाबदारी म्हणून अनेकदा स्त्रियांना त्यांना हव्या त्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी गमवावी लागते. मात्र कुटुंबीयांतील सदस्यांकडून तिला योग्य तो पाठिंबा मिळाला तर हीच स्त्री कर्तृत्व गाजवू शकते.
निधी व्यवस्थापकपदाची जबाबदारी व कर्तव्ये श्रोत्यांसमोर मांडताना स्वाती कुलकर्णी यांनी २००८ व २०१२ मधील आर्थिक स्थित्यंतरे व राजकीय घडामोडींची आठवण करत आपण बांधलेल्या निधी योजनांचा दाखला दिला. अन्य व्यवस्थापक हे पारंपरिक क्षेत्रातील फंड, योजना तयार करत असताना आपण भर दिलेल्या योजनांना मिळालेले यश या वेळी कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अनेकदा पारंपरिक स्थिर उपन्न देणाऱ्या तसेच ठेवींपेक्षाही अनेकदा लाभदायक ठरते, असे नमूद करत गुंतवणूकविषयक क्लृप्त्या देणाऱ्या ‘तज्ज्ञां’पेक्षा स्वत:च्या जोखमीवर किंवा अभ्यासावर गुंतवणूक करावी, असे त्यांनी सुचवले. दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावकर स्मारक सभागृहात आयोजित या कार्यक्रमात आबालवृद्धांनी गर्दी केली होती. केसरी टूर्सचे उपाध्यक्ष प्रमोद दळवी यांच्या हस्ते या वेळी स्वाती कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट प्रश्न विचारणाऱ्या श्रोत्यांनाही या वेळी कुलकर्णी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

  • आर्थिक क्षेत्रात तुलनेने महिलांच्या कमी असलेल्या प्रमाणाबाबत कुलकर्णी यांनी चिंता व्यक्त केली. कौटुंबिक जबाबदारीमुळे महिलांना अनेकदा नोकरीवर पाणी सोडवे लागते.
  • यामुळेही बऱ्यापैकी आर्थिक शिक्षण घेतलेल्या अथवा जाण असलेल्या तज्ज्ञ महिला वर्ग या क्षेत्रात राहत नाहीत.
  • आर्थिक गुंतवणूक ते शेअर बाजारापेक्षा म्युच्युअल फंडासारखा गुंतवणूक पर्याय हा अनेकदा संयमी वृत्तीमुळे दीर्घकालीन लाभ देणारा ठरतो, अशी उकल कुलकर्णी यांनी या वेळी केली.