गणपती उत्सवात महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे मंडळाची असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी म्हटले आहे. गणेश मंडपात महिलेशी छेडछाड किंवा गैरवर्तणूक झाल्यास, त्यासाठी संबंधित मंडळ जबाबदार राहील असेही पोलीस आयुक्त म्हणाले.
सत्यपाल सिंह म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांमध्ये महिला भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संपूर्णपणे गणेश मंडळांची असेल. कोणत्याही महिलेशी गैरवर्तन झाल्यास त्यासाठी मंडळ जबाबदार ठरेल आणि पुढील वर्षी या मंडळाची मान्यता रद्द करण्यात येईल असेही सत्यपाल सिंह म्हणाले. भाविकांची गर्दी होणाऱया गणेश मंडळांनी आपल्या सर्वोतोपरिने भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. मुंबई पोलीस दलही सुरक्षीत उत्सवासाठी सज्ज आहे. पोलिसांना प्रत्येक मंडळानेही सहकार्य करावे असे आवाहनही सत्यपाल सिंह यांनी केले आहे.  
पोलीस आयुक्तांच्या या आदेशामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी गणेशोत्सव मंडळे अधिकाअधिक प्रयत्न करतील आणि पोलिसांवरील असणाऱया जबाबदारीचा भारही काही प्रमाणात हलका होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.