कपडय़ांसाठी प्रमाणित मोजमाप तक्ता तयार, ‘साइज’मधील फरकाचा संभ्रम दूर

कपडे खरेदी करताना कुठला साइझ ‘आपला’ याबाबत नेहमी गोंधळ उडतो, कारण कपडय़ांच्या ब्रॅण्डनुसार मापेही बदलतात. आता मात्र भारतीय स्त्रियांसाठी तयार कपडय़ांची खरेदी थोडी सोपी होण्याची शक्यता आहे. मुंबईत बुधवारपासून सुरू झालेल्या लॅक्मे फॅशन वीकदरम्यान प्रथमच ‘विमेन्स स्टॅण्डर्ड साइझ चार्ट’ सादर करण्यात आला. या तक्त्य़ाच्या मदतीने कोणत्याही ब्रॅण्डचे कपडे आपल्या मापाप्रमाणे मिळवणे किंवा शिवून घेणे स्त्रियांना सोपे झाले आहे.

तयार कपडय़ांच्या खरेदीच्या वेळी मोठा प्रश्न असतो मापाचा. एका ब्रॅण्डचा ‘स्मॉल साइझ’ दुसऱ्या ब्रॅण्डच्या ‘मीडियम’ किंवा ‘लार्ज साइझ’एवढादेखील असण्याची शक्यता असते. त्यामुळे स्त्रियांना प्रत्येक वेळी तयार ड्रेस अंगावर चढवून बघितल्याशिवाय खरेदीला पर्याय नसतो. अमेरिकन, युरोपियन साइझ चार्टचा आधार घेत वेगवेगळ्या मापाचे कपडे बनवल्यामुळे ही समस्या येते. आत्तापर्यंत भारतीय स्त्रियांच्या प्रमाणबद्धतेचा वेगळा असा विचार झालाच नव्हता. मात्र, वेंडेल रॉड्रिक्स यांनी आता खास भारतीय स्त्रियांच्या मापासाठीचा प्रमाणित तक्ता तयार केला आहे. ‘लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्ह २०१६’ दरम्यान वेंडेल यांनी हा तक्ता सादर केला. विशेष म्हणजे १९८८ पासून त्यांचे यावर संशोधन सुरू होते.

स्त्रियांसाठीच्या तयार कपडय़ांचे भारतीय ब्रॅण्ड बाजारात सार्वत्रिक व्हायला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही त्यांच्या मापांसाठी अमेरिकी किंवा युरोपीय प्रमाणतक्ता (साइज चार्ट) वापरण्यात येत असल्याने वेगवेगळय़ा ब्रॅण्डचे कपडे निवडताना महिलांचा गोंधळ उडतो. मुळात भारतीय स्त्रियांची शारीरिक ठेवण, उंची, प्रमाणबद्धता पाश्चिमात्य स्त्रियांपेक्षा भिन्न आहे. तरीही एवढे दिवस पाश्चिमात्य साइझ चार्टच प्रमाण मानून त्यामध्ये भारतीय सोयीने बदल करून कपडे शिवले जातात. हेच थांबवण्यासाठी भारतीय प्रमाणित तक्ता तयार केल्याचे रॉड्रिक्स म्हणाले.

‘पुरातन भारतीय शिल्पांमधून भारतीय स्त्रीच्या प्रमाणबद्धतेची कल्पना येते. भारतात वेगवेगळ्या चणीच्या स्त्रिया आढळतात. त्यामध्येही प्रचंड वैविध्य आहे आणि तेच खरे आव्हान आहे. काहींचे खांदे रुंद असतात तर काहींची कंबर जाड असते. शरीरयष्टीत प्रादेशिक फरकदेखील मोठे आहेत. तरीदेखील भारतीय स्त्रियांसाठी कपडे तयार करताना एक प्रमाण तक्ता असणं गरजेचं आणि सोयीचं आहे,’ असेही त्यांनी बुधवारी ‘फॅशन वीक’मध्ये हा तक्ता सादर करताना स्पष्ट केले.