काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाउडी मोदी कार्यक्रमाची स्तुती करणारे ट्विट केले. ज्यानंतर मिलिंद देवरा भाजपात जाणार की काय ? या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सगळ्या चर्चा करणाऱ्यांना मिलिंद देवरा यांनी उत्तर दिलं आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर एक भली मोठी पोस्ट लिहून आपल्याबाबत उलटसुलट चर्चा करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे देवरा यांनी ?

” मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारं ट्विट केल्यानंतर आणि त्यांनी मला त्यावर उत्तर दिल्यानंतर लगेचच काही उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. माझे वडील मुरली देवरा यांनी भारत-अमेरिका संबंध चांगले कसे व्हावेत यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल लिहिले होते. माझे वडील मुरली देवरा हे १९६८ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेत गेले होते. तेव्हा तिथे त्यांनी रॉबर्ट एफ केनडी यांची भेट घेतली होती. त्यानंतर गेल्या पाच दशकांपासून तिथल्या राजकीय व्यक्तींसोबत माझ्या कुटुंबीयांचे चांगले संबंध आहेत.”

“माझे वडील स्व. मुरली देवरा यांनी देशातल्या विविध पंतप्रधानांसोबत तसेच अमेरिकेतल्या विविध राष्ट्राध्यक्षांसोबत काम केलं आहे. त्यावेळी त्यांनी पक्ष धोरण बाजूला ठेवून त्यांनी देशहित जपलं आहे. देशहित आधी जपणारे माझे वडील हे सच्चे देशभक्त होते. त्यांचा मला अभिमान आहे. त्याचीच आठवण मी मोदींना करुन दिली. त्यांनी माझे आभारही मानले. मात्र यानंतर मी भाजपात प्रवेश करणार, मी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा सुरु झाल्या. अशा सगळ्यांना एकच अस्पष्ट उत्तर देतो जेव्हा देश आणि परराष्ट्र धोरण हे समोर असतील तेव्हा मी माझ्या वडिलांच्या म्हणजेच मुरली देवरा यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणार ” असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

“मैत्रीपूर्ण संबंध हा माझ्या वडिलांनी केलेल्या राजकारणाचा पाया होता. त्याचमुळे त्यांचे मित्र वाळकेश्वरपासून वॉशिंग्टनपर्यंत होते. तसेच भुलेश्वरपासून बोस्टनपर्यंत होते.” या आशयाची एक पोस्ट लिहून मिलिंद देवरा यांनी चर्चा करणाऱ्यांना खास शैलीत उत्तर दिलं आहे.