चष्मा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन काचा आणि लोखंडी किंवा प्लॅस्टिक किंवा अगदीच फायबरच्या काडय़ा असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र लाकडी फ्रेमचा चष्मा असू शकतो अशी कल्पनाही आपण कधी केली नसेल. पण परदेशात असे काही ब्रँड्स आहेत जे लाकडी फ्रेम्स देतात आणि ते दिसायलाही फार वेगळे असतात. भारतीय बाजारातही अशा फ्रेम्स उपलब्ध आहेत. मात्र परदेशी ब्रँड्स असल्यामुळे अर्थात त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यामुळे या क्षेत्रात भारती ब्रँड्सची गरज होती. हेच ओळखून मुंबईतील दोन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वूडन्सनावाने लाकडी गॉगल्स विकण्यास सुरुवात केली. ऑनलाइन बाजारात त्यांच्या या उत्पादनाला चांगलीच मागणी आहे.

नोकरी न करता व्यवसायच करायचा हे मनाशी बांधलेला सध्या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेला अकिल मिर्झा याने त्याचा एमबीएधारक मित्र रशीद शेख यांच्या साथीने पॉकेटमनी मिळवण्याच्या उद्देशाने विविध उत्पादने विकण्यास सुरुवात केली. पण फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या संकेतस्थळांवरील मोठय़ा ब्रँड्सपुढे त्यांचा निभाव लागणे तसे कठीण होते. काही वेळेस वस्तू विकल्या जायच्या काही वेळेस काहीच विक्री व्हायची नाही. मग या दोघांनी सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू विकण्यापेक्षा काहीतरी वेगळे करावे अशी भावना या दोघांच्या मनात आली. या दोघांनीही त्यावर विचार करण्यास सुरुवात केली. महिन्याभराच्या विचारमंथनानंतर त्यांना लाकडी गॉगल्स विकता येतील का ही कल्पना सुचली. परदेशात या गॉगल्सची चांगलीच फॅशन आहे. भारतातही काही लोक हे वापरतात, पण त्याची उपलब्धता कमी असल्यामुळे त्याचा वापरही कमी आहे. हे सर्व लक्षात घेऊन त्यांनी काही कच्चा माल मागवून त्यातून लाकडी फ्रेम्सचे गॉगल्स बनवले. सुरुवातीला २५ ते ३० गॉगल्स बनवले व त्याला बाजारात कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी त्यांनी विविध कंपन्यांमध्ये आपले गॉगल्स मांडले. तेथे लोकांनी त्यांच्या या गॉगल्सना चांगला प्रतिसाद दिला. मग त्यांनी ‘वूडन्स’ असा ब्रँड करून ते फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, क्राफ्टलीसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांवर विक्रीची सुरुवात केली. यामध्ये क्राफ्टली या संकेतस्थळाने त्यांच्या उत्पादनाच्या ब्रँडिंगची जबाबद़ारीही घेतली. यामुळे तेथूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला.

बांबूपासून या फ्रेम्स तयार केल्या जातात. यासाठी आवश्यक तो कच्चा माल चीनहून आयात केला जातो. हा कच्चा माल आला की नवी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात ते जोडण्याचे काम केले जाते. हे जोडले गेले की ते विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातात. याचे वैशिष्टय़ म्हणजे हे बनवत असलेली प्रत्येक फ्रेमही निराळी असते. यामुळे एकसारखी फ्रेम्स वूडन्समध्ये दिसत नाही असे अकील सांगतो. याचबरोबर आणखी एक खासियत म्हणजे या दोघांनी आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक दायित्वही लक्षात ठेवत त्यांच्या प्रत्येक गॉगलच्या विक्रीमागे ते एक झाड लावतात. जेणेकरून निसर्गाकडून घेतल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची परतफेड होऊ शकेल.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

सुरुवातीला केवळ पॉकेटमनी म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायात दोन्ही भागीदारांनी ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. सध्या त्याच्यावर काम सुरू आहे. जास्तीतजास्त काम आम्ही दोघे स्वत: करत असल्यामुळे ते कमीतकमी पैशात होत असल्याचे अकील सांगतो. आमच्या ब्रँडचे संकेतस्थळही आम्हीच विकसित केल्याचे अकीलने नमूद केले. बाहेर कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: निधी उभारून काम करण्यावर आमचा भर आहे. गॉगल्सची विक्री झाल्यावर आम्हाला त्यातून उत्पन्न होत असते. गेल्या सहा महिन्यांत या उत्पादनाला ऑनलाइनसोबतच ऑफलाइनही मागणी वाढत आहे. त्यामुळे आम्हाला पुरेसे उत्पन्न मिळत असल्याचे अकिलने सांगितले.

नवउद्यमींना सल्ला

अकिल शिकत असला तरी तो गेल्या दीड वर्षांपासून व्यवसायात विविध अनुभव घेत आहे. या अनुभवातून शिकून अकीलने नवउद्यमींना सुरुवातीला अर्धवेळ व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याला बाजारात कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी सध्या ऑनलाइन व्यासपीठ सर्वात मोठे आहे.

त्याचा वापर करून आपण सध्या करत असलेले काम सांभाळून अर्धवेळ व्यवसाय करा. जर त्या व्यवसायातून नफा मिळण्यास सुरुवात झाली तर तो पुढे सुरू ठेवा नाही तर दुसरा पर्याय शोधा. सुरुवातीला अर्धवेळ व्यवसाय केल्यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा पाया भक्कम करता येऊ शकेल असेही अकीलने नमूद केले.

भविष्यातील वाटचाल

भविष्यात ‘वूडन्स’ हा एक मोठा ब्रँड बनविण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आमची टीम मोठी करून शहरांमधील दुकानांमध्ये जाऊन त्याचे विपणन करून तेथे हे गॉगल्स उपलब्ध करून देण्याचा मानस अकिलने व्यक्त केला. याचबरोबर ब्रँडचे नाव सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे अकिलने नमूद केले.

@nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com