‘शब्द गप्पांचा’ कार्यक्रम यंदा २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ‘मुक्त शब्द मासिक’, ‘मुक्त पब्लिकेशन’ आणि ‘शब्द द बुक गॅलरी’ यांच्यातर्फे आयोजित करणाऱ्या या कार्यक्रमाचे हे ११वे वर्ष असून बोरिवलीत ३ जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम रंगणार आहे.
‘शब्द गप्पा’ या कार्यक्रमाचा शुभारंभच २५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता पुस्तक प्रदर्शनाने होणार आहे. बोरिवली पश्चिमेकडील चिंतामणी ट्रस्ट उद्यान येथे हा कार्यक्रम होणार असून २५ डिसेंबरला संध्याकाळी ७.३० वाजता प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या मुलाखतीने या ‘शब्द गप्पां’चे पहिले पुष्प गुंफले जाईल. प्रा. केशव परांजपे ही मुलाखत घेणार आहेत. अभिनेता, दिग्दर्शक अमोल पालेकर यांची मुलाखत २६ डिसेंबरला शशी व्यास घेणार आहेत. रविवारी २७ डिसेंबरला ‘आरोप देशद्रोहाचा’ या विषयावर परिसंवाद रंगणार आहे. यात अरुण फरेरा, सुधीर ढवळे, अ‍ॅड. शबाना खान आणि निवृत्त पोलीस अधिकारी जयवंत हरगडे सहभागी होणार असून संवादक म्हणून अ‍ॅड. संध्या गोखले आणि राहुल कोसम्बी काम पाहणार आहेत.
२८ डिसेंबरला सोमवारी अतुल देऊळगावकर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची मुलाखत घेणार आहेत. २९ डिसेंबरला पुन्हा एकदा ‘इसिस : आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बदलता चेहरा’ या विषयावर परिसंवाद होणार असून प्रा. अरुणा पेंडसे या चर्चेत सहभागी होणाऱ्या डॉ. अशोक मोडक, प्रकाश बाळ आणि फिरोज मिठीबोरवाला यांना बोलते करणार आहेत. ३० डिसेंबरला युवा नाटककार मनस्विनी लता रवींद्र आणि युवा कवी वीरा राठोड यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.